"इस्रो'ची गगनझेप...

"इस्रो'ची गगनझेप...

एकाच वेळी 20 उपग्रहांचे प्रक्षेपण; अशी कामगिरी करणारा भारत तिसरा देश 

श्रीहरीकोटा - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी 20 उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला. या उपग्रहांपैकी 17 उपग्रह विदेशी असून तीन भारतीय उपग्रह आहेत. 

"इस्रो‘च्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारीच 48 तासांची उलटगणती सुरू झाली होती. आज सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी "पीएसएलव्ही- सी-34‘ हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला.

यशस्वीरीत्या उपग्रह प्रक्षेपित करण्याची "पीएसएलव्ही‘ची ही 36 वी वेळ आहे. प्रक्षेपणानंतर 18 मिनिटांनी उपग्रह कक्षेत सोडण्यात सुरवात झाली. वेगवेगळ्या कक्षेत हे उपग्रह सोडण्यात आले. यासाठी प्रक्षेपणाच्या चौथ्या व अंतिम टप्प्यात प्रक्षेपकाचे इंजिन दोनदा सुरू करण्यात आले. वीस किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रह एकाच वेळी सोडण्याची कामगिरी करणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. रशिया आणि अमेरिकेने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. 

आज सोडलेल्या 20 उपग्रहांचे एकूण वजन 1288 किलोग्रॅम आहे. 

भारतीय उपग्रह 

- आज प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये "कार्टोसॅट- 2‘, "सत्यभामा‘ आणि "स्वयम्‌‘ या तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे. 

- "कार्टोसॅट- 2‘चे वजन 727.5 किलो आहे. दूरसंवेदन आणि निरीक्षणासाठी प्रामुख्याने याचा उपयोग होईल. 

- "कार्टोसॅट- 2‘द्वारे काढण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर नियोजनासाठी प्रामुख्याने करण्यात येणार आहे, त्यातही पाणीवाटपाच्या दृष्टीने त्याचा वापर होणार आहे. 

- "स्वयम्‌‘ हा 990 ग्रॅम वजनाचा उपग्रह पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीईओपी) विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. कम्युनिटी रेडिओसाठी त्याचा वापर होणार आहे. 

- "सत्यभामा‘ हा उपग्रह चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठाने तयार केला असून, त्याचे वजन दीड किलो आहे. हरितगृहवायूंची माहिती गोळा करण्याचे काम तो करेल. 

विदेशी उपग्रह 

- अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशियाचे एकूण 17 उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. 

- अमेरिकेच्या 13 उपग्रहांचा त्यात समावेश आहे. 

- "लापान-3‘ (इंडोनेशिया), "बायरोस‘ (जर्मनी), "एम2एमसॅट‘ व "जीएचजीसॅट-डी‘ (कॅनडा), "स्कायसॅट जेन2-1‘ (गूगल, अमेरिका) आणि अमेरिकेचे 12 "डोव्ह‘ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. 

- गूगलच्या टेराबेला अर्थ इमेजिंग सॅटेलाइटद्वारे (स्कायसॅट जेन 2-1) पृथ्वीची उच्च प्रतीची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढली जातील. 

"इस्रो‘ने आतापर्यंत 57 विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. त्यातून 10 कोटी डॉलर (660 कोटी रुपये) उत्पन्न मिळाले आहे. 

- प्रक्षेपणासाठी आलेला खर्च इतर देशांच्या तुलनेत निम्मा आहे. 

"पीएसएलव्ही‘चे विक्रमी 20 उपग्रहांसह यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्रोच्या पथकाचे मनापासून अभिनंदन! 

- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती 

एकावेळी 20 उपग्रह...इस्रो सातत्याने नवे अडथळे पार करत आहे. या अविस्मरणीय कामगिरीसाठी आमच्या वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन. पुणे आणि चेन्नईतील संस्थांच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह बनविण्यात भूमिका बजावल्याचा अतिशय आनंद झाला. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

सर्व 20 उपग्रह यशस्वीपणे त्यांच्या कक्षेत स्थिरावले. या कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन. 

- एस. किरण कुमार, इस्रोचे अध्यक्ष 

या प्रक्षेपणासह इस्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मी पूर्ण पथकाचे मनापासून आभार मानतो. 

- पी. उन्नीकृष्णन, सतीश धवन अवकाश केंद्राचे संचालक 

आजचे प्रक्षेपण एक मैलाचा टप्पा आहे. सर्व उपग्रह चांगली कामगिरी करतील. 

- डी. जयकुमार, मोहिमेचे संचालक 

भारत जगातला तिसरा देश 

इस्रोने आज पीएसएलव्ही-सी 34 द्वारे विक्रमी 20 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिका आणि रशियानंतर भारत अशी कामगिरी करणारा तिसरा देश बनला आहे. एकाच प्रक्षेपकाद्वारा अमेरिकेने 29 आणि रशियाने 37 उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोने यापूर्वी 2008 मध्ये एकाचवेळी 10 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. आज भारताने अमेरिकेच्या 13, कॅनडाच्या दोन आणि जर्मनी तसेच इंडोनेशियाच्या प्रत्येकी एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आतापर्यंत भारताने 57 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

‘इस्रो‘ची भरारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पीएसएलव्ही - सी34 या प्रक्षेपकाच्या मदतीने एकाचवेळी 20 उपग्रहांचे प्रक्षेपण करून मैलाचा दगड गाठला. इस्रोच्या सातत्यपूर्ण कामगिरीकडे इतर देशांचेही लक्ष वेधले गेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत इस्रोने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. इस्रोच्या महत्त्वाची कामगिरी, भविष्यातील मोहिमा आदींवर दृष्टिक्षेप... 

मंगळ मोहीम 

सप्टेंबर 2014 - इस्रोच्या मंगळयानाचा दहा महिन्यांच्या प्रवासानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश. भारतासाठी ऐतिहासिक क्षण. पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत पहिला देश. 

मिशन पीएसएलव्ही - सी28 

जुलै 2015 - ब्रिटनच्या एकूण 1440 किलो वजनाच्या पाच उपग्रहांचे प्रक्षेपण. इस्रोची ही सर्वांत "वजनदार‘ व्यावसायिक मोहीम. मोहिमेच्या यशामुळे इस्रोच्या विश्‍वासार्हतेत वाढ. 

चांद्रयान 

ऑक्‍टोबर 2008 - इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी योजनेस पहिल्या टप्प्यांतर्गत चांद्रयान - 1 या मोहिमेस सुरवात. मून इम्पॅक्‍ट प्रोबकडून चंद्राशी संपर्क साधून चंद्रावर पाणी असल्याचा महत्त्वपूर्ण शोध. 

इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम्स (आयआरएनएसएस) 

1 जुलै 2013 - स्वदेशी बनावटीच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण. या प्रणालीतील सात उपग्रहांचे टप्प्याटप्प्याने प्रक्षेपण. एप्रिल 2016 मध्ये शेवटचा उपग्रह अवकाशात सोडला. प्रणालीचे "नाविक‘ असे नामकरण. भारत व भारताशेजारील दीड हजार किमी परिसरातील रिअल टाइम पोझिशनिंग सेवा देण्याचे उद्दिष्ट. 

इस्रोच्या भविष्यातील मोहिमा 

आगामी वर्षात "कार्टोसॅट-2 सी‘ आणि "रिसोर्ससॅट-2ए‘ चे प्रक्षेपण. "इन्सॅट 3डीआर‘ आणि "स्कॅटसॅट-1‘ हे हवामानविषयक उपग्रहही सोडण्यात येणार. 

भारताच्या "जीएसएलव्ही मार्क3‘ या सर्वांत वजनदार उपग्रह नेणाऱ्या लॉंच व्हेईकलचे प्रक्षेपण. ही मोहीम यशस्वी झाल्यास चार टनांपर्यंतचे वजन नेण्याच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब. इतर देशांच्या अंतराळ संस्थांवरील अवलंबित्वही कमी होणार. 

चांद्रयान 2 मोहीम 2018 पर्यंत राबविण्यात येणार. स्वदेशी बनावटीच्या ल्युनार ऑर्बिटर, लॅंडर आणि रोव्हरचा समावेश. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील माती व दगडांच्या नमुन्याचे विश्‍लेषण करेल. त्यानंतर, ऑर्बिटरच्या माध्यमातून पृथ्वीला माहिती पाठविली जाईल. 

इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत (पीएसएलव्ही) आतापर्यंत 21 देशांच्या 57 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण. 

इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रिक्‍स कार्पोरेशन लि.कडून 2016-17 या वर्षामध्ये सात देशांबरोबर 25 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी करार. त्यात अमेरिकेच्या 12, जर्मनीच्या चार, कॅनडा, अल्जीरियाच्या प्रत्येकी तीन उपग्रहांचा समावेश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com