राजस्थानातील सत्तानाट्य रोज नव-नवी वळणे घेऊ लागले वाचा सविस्तर....

पीटीआय
Monday, 27 July 2020

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच अन्य काही विधेयकांवर चर्चा करण्यासाठी ३१ जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्यात यावे अशी मागणी गेहलोत यांच्या गटाकडून करण्यात आली आहे.

जयपूर - राजस्थानातील सत्तानाट्य रोज नव-नवी वळणे घेऊ लागले आहे. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे नवा प्रस्ताव पाठविला आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोठेही बहुमत चाचणीचा उल्लेख केलेला नाही. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच अन्य काही विधेयकांवर चर्चा करण्यासाठी ३१ जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्यात यावे अशी मागणी गेहलोत यांच्या गटाकडून करण्यात आली आहे. 

याआधी गेहलोत यांच्या गटाने कॉंग्रेसला बहुमत सिध्द करता यावे म्हणून विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्यात यावे असा आग्रह धरला होता. राज्यपालांनी येथे सरकारवर कुरघोडी करत कोरोना संसर्गाचे कारण देत तो फेटाळून लावला होता. आता कॉंग्रेसने नव्याने प्रस्ताव पाठवून कायदेशीर खेळी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सोशल मिडियावरुन कॉंग्रेसचा हल्ला 
कॉंग्रेसने आता सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य करायला सुरवात केली असून घटनात्मक आणि लोकशाही परंपरेचा भाजपने अवमान केला असल्याचा आरोप पक्षाकडून करण्याच आला आहे. #SpeakUpForDemocracy या हॅशटॅगचा वापर करत आज भाजपविरोधात ऑनलाइन मोहीम छेडण्यात आली. देशामध्ये आरोग्य आणीबाणी सुरु असताना केंद्र सरकार राजस्थान सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताची लोकशाही राज्यघटनेच्या आधारावर जनतेच्या आवाजाने चालेल. भाजपच्या छळ आणि कपटीपणाचे कारस्थान हाणून पाडत देशाची जनता लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करेल. 
राहुल गांधी, सरचिटणीस कॉंग्रेस 

संकटाच्या काळामध्येच नेतृत्वाची खऱ्या अर्थाने ओळख पटत असते. कोरोना राष्ट्रीय संकटाच्या काळामध्ये देशाला जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेत्याची गरज आहे. भाजप मात्र लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. यावरून त्यांच्या मनामध्ये काय सुरु आहे हे स्पष्टपणे दिसून येते. या कृत्यामुळे पक्षाचे चारित्र्य देखील स्पष्ट होते. 
प्रियांका गांधी, सरचिटणीस कॉंग्रेस 

राज्य सरकारने अनेकदा विनंती केल्यानंतर देखील राज्यपालांनी विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्यास नकार दिला आहे. देशाच्या राजकीय इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडते आहे. लोकांनी निवडून दिलेल्या राजस्थानातील सरकारला दिल्लीत बसलेल्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते का? 
अजय माकन, नेते कॉंग्रेस 

केंद्रातील भाजपचे नेते राजस्थानातील आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत पण येथेही लोकशाहीचाच विजय होईल आणि कारस्थान पराभूत होईल. 
गोविंदसिंह डोटासारा, प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस 

भाजपने दिवसाढवळ्या मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार पाडले होते राजस्थानात मात्र त्यांचे कारस्थान उघडे पडले. लोकशाही ही काय दिल्ली दरबाराची गुलाम आहे का? 
रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते कॉंग्रेस 

राज्यातील कॉंग्रेसची अवस्था ही शंभर उंदीर खावून यात्रेला जाणाऱ्या मांजरासारखी आहे. 
सतीश पुनिया, प्रदेशाध्यक्ष भाजप 

केंद्रातील मास्तरांचे प्रश्नच राज्यपाल मिश्रा येथे वाचून दाखवित आहे. कोरोना संकटाच्या काळामध्ये अनेक विधानसभा सुरु असून राज्यपालांना निदान याची माहिती असणे गरजेचे आहे. 
अभिषेक मनू सिंघवी, नेते कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ​Chief Minister Ashok Gehlot has again sent a new proposal to Governor