आंध्र प्रदेशास शक्तिशाली वादळाचा फटका...

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

काही काळासाठी उत्तर दिशेकडे आणि त्यानंतर वायव्येकडे, असा या वादळाचा प्रवास होणार असून; आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीस येत्या चार दिवसांत हे वादळ धडकण्याची शक्‍यता असल्याची माहिती "सागरी वादळ पूर्वकल्पना केंद्रा'मधील प्रवक्‍त्याने दिली आहे

हैदराबाद - बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या एका तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे सागरी वादळामध्ये रुपांतर झाल्याचे वृत्त "दी हिंदु'ने दिले आहे. या वादळाचे नामकरण "वरदाह' असे करण्यात आले आहे.

हे वादळ सध्या विशाखापट्टणमच्या आग्नेयेस सुमारे 1,040 किमी अंतरावर; तर मछलीपट्टणम शहरापासून 1,135 किमी अंतरावर आहे. येत्या काही तासांत हे वादळ अधिक विध्वंसक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर काही काळासाठी उत्तर दिशेकडे आणि त्यानंतर वायव्येकडे, असा या वादळाचा प्रवास होणार असून; आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीस येत्या चार दिवसांत हे वादळ धडकण्याची शक्‍यता असल्याची माहिती "सागरी वादळ पूर्वकल्पना केंद्रा'मधील प्रवक्‍त्याने दिली आहे.

या नैसर्गिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर, मच्छिमारांना सागरामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर, याआधीच सागरामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या सर्व मच्छिमारांनीही 10 डिसेंबरच्या आतमध्ये परतावे, असेही या केंद्राने स्पष्ट केले आहे.

Web Title: ‘Vardah’ likely to hit AP coast in the next four days