यूपीएससीत बेळगावच्या निखिल निपाणीकर, प्रतीक पाटीलचे यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

बेळगाव - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवले आहे. त्यात भाग्यनगरमधील प्रतीक पाटीलने ३६६ वा तर कॅम्पमधील निखिल निपाणीकरने ५६३ वा क्रमांक पटकावला आहे.

बेळगाव - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवले आहे. त्यात भाग्यनगरमधील प्रतीक पाटीलने ३६६ वा तर कॅम्पमधील निखिल निपाणीकरने ५६३ वा क्रमांक पटकावला आहे. प्रतीक दुसऱ्यांदा तर निखिल पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

प्रतीकने २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळी त्याला ५४४ वा क्रमांक मिळाला होता. त्यावर त्याचे समाधान झाले नव्हते. त्यासाठी त्याने गेल्यावर्षी ही परीक्षा पुन्हा देऊन आपला क्रमांक १७८ अंकांनी सुधारला आहे. त्याला ३६६ वा क्रमांक मिळाला आहे. प्रतीकचे शालेय शिक्षण सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये झाले. जीआयटी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. कडोलकर गल्लीतील गुंतवणूक सल्लागार राजकुमार पाटील यांचा तो मुलगा आहे.

निखिल निपाणीकरने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवले आहे. त्याने ५६३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. निखिलसुद्धा सेंट पॉल्स हायस्कूलचाच विद्यार्थी असून शासकीय तंत्रनिकेतनमधून त्याने मेकॅनिकल पदविका प्राप्त केली. बंगळूरच्या आरव्ही अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने २०१६ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात त्याने या परीक्षेत यश मिळविले आहे. महापालिकेच्या शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांचा तो भाचा असून धनराज निपाणीकरांचा मुलगा आहे.