'पूर्वा एक्‍स्प्रेस'चे 12 डबे रेल्वे रुळावरून घसरले; 15 जण जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

हावडा - नवी दिल्ली पूर्वा एक्‍स्प्रेसचे 12 डबे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून, त्यात 15 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. 

कानपूर : हावडा - नवी दिल्ली पूर्वा एक्‍स्प्रेसचे 12 डबे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून, त्यात 15 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. 

"पूर्वा एक्‍स्प्रेस' नवी दिल्लीच्या दिशेने जात असताना रूमा रेल्वे स्थानकापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर 12 डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले. त्यापैकी चार डबे पूर्णपणे उलटले होते, अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्‍त्याने दिली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. 

किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी पाच हजार आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत उत्तर मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले, की अपघात झालेल्या "पूर्वा एक्‍स्प्रेस'मधील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी 14 डब्यांच्या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. ही रेल्वेगाडी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीकडे रवाना करण्यात आली, तर उर्वरित प्रवाशांसाठी दुसऱ्या एका रेल्वे गाडीचीही व्यवस्था करण्यात आली होती. 

अपघात झाल्यानंतर प्रवाशांना बसद्वारे कानपूर रेल्वे स्थानकावर आणण्यात आल्याची माहिती कानपूरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रेम प्रकाश यांनी दिली. 

Web Title: 12 Coaches of Poorva Express Trains have been dropped