नवी दिल्ली: बॅंकेतील 12 बनावट खात्यात 60 कोटी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - प्राप्तीकर विभागाने ऍक्‍सिस बॅंकेच्या दिल्लीतील कृष्णा नगर शाखेवर छापा टाकला असून बॅंकेत 12 बनावट खाती असल्याचे आढळून आले आहे. या बनावट खात्यांमध्ये मिळून 60 कोटी रुपयांची रक्कम जमा असल्याचेही निदर्शनास आले आहे.

नवी दिल्ली - प्राप्तीकर विभागाने ऍक्‍सिस बॅंकेच्या दिल्लीतील कृष्णा नगर शाखेवर छापा टाकला असून बॅंकेत 12 बनावट खाती असल्याचे आढळून आले आहे. या बनावट खात्यांमध्ये मिळून 60 कोटी रुपयांची रक्कम जमा असल्याचेही निदर्शनास आले आहे.

प्राप्तीकर विभागाच्या नोएडा शाखेने काळा पैसा शोधण्याची मोहिम घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभागाने ऍक्‍सिस बॅंकेवर छापा टाकला. त्यामध्ये 12 बनावट कंपन्यांच्या नावे खाते असल्याचे आढळून आले आहे. बनावट कंपन्यांच्या नावे ऍक्‍सिस बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखेत खाते उघडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात येत आहे. या बनावट कंपन्यांबाबत प्राप्तीकर विभागाला पुरेशी माहिती मिळाली त्या आधारे या प्रकरणाच्या प्रमुख सूत्रधारांपर्यंत विभागाला पोचता येईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिली आहे.

या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय प्राप्तीकर विभागाच्या संपर्कात असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी नऊ डिसेंबर रोजी चांदणी चौक येथील एका बॅंकेत 15 बनावट खात्यांमध्ये तब्बल 450 कोटी रुपये जमा केल्याचे आढळून आले होते. नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी किंवा बॅंकेत जमा करण्यासाठी काळा पैसा धारकांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्राप्तीकर विभागानेही देशभरात मोहिम उघडली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा सापडत आहेत.

Web Title: In 12 fake accounts of Axix Bank found 60 crore