उत्तर प्रदेशात 128 कोटींचे वीजबिल

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील चमरी गावातील एका नागरिकास चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे वीजबिल आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीजबिल पाहून त्या नागरिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

लखनौ : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील चमरी गावातील एका नागरिकास चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे वीजबिल आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीजबिल पाहून त्या नागरिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

शमीम असे वीजबिलधारकाचे नाव आहे. जून महिन्याचे 128 कोटींचे वीजबिल पाहून त्यांना धक्काच बसला. हे बिल घेऊन ते वीज मंडळाच्या कार्यालयात गेले. आपले म्हणणे कोणीही ऐकून घेण्यास तयार नसल्याचे शमीम यांचे म्हणणे आहे. एवढे बिल कोठून भरणार असा सवालही त्यांनी केला आहे. जोपर्यंत बिल भरले जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरू होणार नाही, असे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. मी गरीब असून, एवढे बिल मला कसे येऊ शकते, असा प्रश्‍न त्यांनी केला. दरम्यान, सहायक वीज अभियंता रामशरण यांनी तांत्रिक कारणामुळे एवढे बिल आले असावे.

लवकरच बिलावर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी नमूद केले. आपल्याला बिल सादर केल्यास तातडीने त्याचा निपटारा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर योग्य बिल त्यांना दिले जाईल. हा फार मोठा विषय नसून, तांत्रिक कारणामुळे असे प्रकार घडत राहतात, असे रामशरण म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 128 crore electricity bill in Uttar Pradesh