छेड काढलेल्या मुलीस 'पवित्र' करण्यासाठी तिचे कापले केस...

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

काही दिवसांनी बैगा आदिवासी या मुलीच्या समाजामधील काही जणांनी एक सभा घेत पालकांना संबंधित मुलगी अपवित्र झाल्याचे सांगितले. यामुळे तिला पुन्हा पवित्र करुन घेण्यासाठी तिचे केस कापण्यास सांगण्यात आले. याचबरोबर, या समाजाच्या सभासदांसाठी पालकांना मेजवानीही द्यावी लागली

रायपूर - छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यामधील एका 13 वर्षीय मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर तिला पुन्हा "पवित्र' करण्यासाठी तिच्या समाजाने तिचे केस कापल्याची घटना घडली. दरम्यान, छेड काढणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे. या मुलीस पुन्हा पवित्र करुन घेण्याचा "विधी' करणाऱ्या समाजामधील आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

"गेल्या 21 जानेवारी रोजी अर्जुन यादव (वय 22) या आरोपीने पीडितेची छेड काढली. हा प्रकार कळताच या मुलीच्या पालकांनी पंचायतीमध्ये धाव घेतली. पंचायतीने दुसऱ्या दिवशी आरोपीकडून पाच हजार रुपयांचा दंड घेतला व प्रकरण निकालात काढले. मात्र यानंतर काही दिवसांनी बैगा आदिवासी या मुलीच्या समाजामधील काही जणांनी एक सभा घेत पालकांना संबंधित मुलगी अपवित्र झाल्याचे सांगितले. यामुळे तिला पुन्हा पवित्र करुन घेण्यासाठी तिचे केस कापण्यास सांगण्यात आले. याचबरोबर, या समाजाच्या सभासदांसाठी पालकांना मेजवानीही द्यावी लागली,'' असे येथील पोलिस अधीक्षक लाल उमेद सिंग यांनी सांगितले.

या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: 13-year-old girl molested in Chhattisgarh, hair chopped off by community members as part of 'purification ritual'

टॅग्स