कर्नाटकात 14 बंडखोर आमदारांना ठरविले अपात्र

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून रमेशकुमार यांना हटविण्यासाठी भाजप विधानसभेत प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या रमेशकुमार यांनी गुरुवारी तीन आमदारांना अपात्र ठरविले होते. आता उर्वरित 14 बंडखोर आमदारांनाही अपात्र ठरविले आहे. 

बंगळूर : राजीनामा दिलेल्या 14 बंडखोर आमदारांना आज (रविवार) कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी अपात्र ठरविले आहे. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप सरकारला याचा धोका नसल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून रमेशकुमार यांना हटविण्यासाठी भाजप विधानसभेत प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या रमेशकुमार यांनी गुरुवारी तीन आमदारांना अपात्र ठरविले होते. आता उर्वरित 14 बंडखोर आमदारांनाही अपात्र ठरविले आहे. 

आता अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना मंत्री होता येणार नाही आणि सध्याच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लढताही येणार नाही. या आमदारांचे राजीनामे मंजूर करणार की त्यांनाही अपात्र ठरविणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले बी. एस. येडियुरप्पा सोमवारी (ता. 29) विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. यापूर्वी रमेशकुमार यांनी रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी आणि आर. शंकर या तीन आमदारांना अपात्र ठरविले आहे. या निर्णयाला आव्हान देत तिघांनीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 Karnataka Rebels Disqualified Day Before Trust Vote