'ओबीसीं'मध्ये 15 जातींचा समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील 15 नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. याशिवाय पाकव्याप्त काश्‍मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले.

नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील 15 नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. याशिवाय पाकव्याप्त काश्‍मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशांसाठी 2479 जातींबद्दलची अधिसूचना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये केली होती. यामध्ये नामसाधर्म्य असलेल्या जाती, उपजातीदेखील आहेत. परंतु, यादरम्यान महाराष्ट्रासोबतच आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्‍मीर तसेच उत्तराखंड या राज्यांकडून जवळपास 28 बदल करण्याची मागणी झाली. या यादीमध्ये 15 नव्या जाती, नऊ नामसाधर्म्य असलेल्या जाती, उपजाती आणि चार दुरुस्त्यांचा समावेश आहे. केंद्राच्या सुधारित अधिसूचनेनंतर या जातींना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळतील.

"एमयूटीपी'साठी दहा हजार कोटी
महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे, पालघर, आणि रायगड या चार जिल्ह्यांना लाभ पोचविणाऱ्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला "एमयूटीपी टप्पा 3' येत्या पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यासाठी अंदाजे 10,947 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. याअंतर्गत पश्‍चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड यादरम्यान अतिरिक्त दुहेरी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला होकार मिळाला आहे. यामुळे चर्चगेट ते डहाणू रोड उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेचा विस्तार होणार आहे. पश्‍चिम रेल्वेचा सर्वाधिक वर्दळीचा विरार ते डहाणू दरम्यानचा मार्ग मुंबई-अहमदाबाद व दिल्ली या प्रमुख रेल्वे मार्गाचा हिस्सा आहे.
याशिवाय, पनवेल-कर्जत या मार्गाच्या दुहेरीकरणाचीही यात तरतूद आहे. यामुळे पनवेल मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटीएम) हा मार्ग सुरू होणार आहे. कल्याण मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या विद्यमान मार्गापेक्षा हे अंतर 23 किलोमीटरने कमी होणार असून, धीम्या लोकलचा प्रवास 35 ते 40 मिनिटांनी कमी होईल. कल्याणहून वाशी किंवा पनवेल ला जाणाऱ्या प्रवाशांना ठाण्याला उतरून हार्बर लाइनने उलटा प्रवास करावा लागतो. परिणामी ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. ऐरोली-कळवा कॉरिडॉरमुळे प्रवाशांना ठाण्याला उतरण्याची गरज भासणार नाही.

निर्वासितांसाठी पॅकेज
पाकव्याप्त काश्‍मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून 36 हजार 384 कुटुंबांना वाढीव आर्थिक मदत दिली जाणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकव्याप्त काश्‍मीरमधून विस्थापित झालेल्या आणि जम्मूमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. प्रत्येक निर्वासित कुटुंबास 5.5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

Web Title: 15 new castes in OBC list