यूपीत बस अपघातात 17 ठार; 25 जखमी 

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव वेगातील खासगी व्हॉल्व्हो बस उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 प्रवासी ठार तर 25 जण जखमी झाले. जयपूरहून फरुक्काबादकडे जाणाऱ्या बसवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 
 

मैनपुरी - उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव वेगातील खासगी व्हॉल्व्हो बस उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 प्रवासी ठार तर 25 जण जखमी झाले. जयपूरहून फरुक्काबादकडे जाणाऱ्या बसवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

इटावा-मैनपूरी महामार्गावर जयपूर-फरुक्काबाद व्हॉल्व्हो खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने किरतपूर पोलिस चौकीजवळील दुभाजकाला बस धडकली आणि उलटली. त्यात पाच प्रवासी जागीच ठार झाले तर 12 जणांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. मृत आणि जखमींत बहुतांशी मजूर असून ते जयपूरहून गावाकडे निघाले होते. चालक वेगाने बस चालवत असल्याचे जखमी प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेत अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले आणि अपघातग्रस्तांना तातडीची सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जखमींना मैनपुरी जिल्हा रुग्णालय आणि सेफई वैद्यकीय कॉलेजमध्ये दाखल केले आहे. अपघातातील बहुतांशी मृत हे फरुक्काबाद जिल्ह्यातील आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात बसचालकाला पाय गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख तर गंभीर जखमींच्या नातेवाइकांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 
 

Web Title: 17 killed 25 injured in bus accident