नव्या झोनसाठी 170 व्हीआयपींचे रेल्वेकडे अर्ज 

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

गेल्या तीन वर्षांत जवळपास 170 व्हीआयपींनी त्यांच्या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या नव्या झोनची अथवा विभागाची मागणी केली असून, त्यांच्या मागण्यांचा रेल्वे मंडळ विचार करत आहे. या व्हीआयपींमध्ये सचिन तेंडुलकर, शशी थरूर, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. 
 

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत जवळपास 170 व्हीआयपींनी त्यांच्या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या नव्या झोनची अथवा विभागाची मागणी केली असून, त्यांच्या मागण्यांचा रेल्वे मंडळ विचार करत आहे. या व्हीआयपींमध्ये सचिन तेंडुलकर, शशी थरूर, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2017 या तीन वर्षांत 55 व्हीआयपींनी रेल्वेच्या नव्या झोनची, तर 119 व्हीआयपींनी नव्या विभागाची मागणी केली आहे. यातील बहुतेक मागण्या राजकीय हेतूंनी प्रेरित असून, प्रत्येक ठिकाणची गरज रेल्वेला पूर्ण करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. "रेल्वेचा झोन तयार करणे ही राजकीय मागणी आहे. याबाबत रेल्वे मंडळाने समिती स्थापन केली होती. नवे रेल्वे झोन तयार करणे हे आर्थिकदृष्ट्या आणि कामकाजदृष्ट्या सोयीचे तर नाहीच, पण सध्या असलेले काही झोनही रद्द केल्यास योग्य ठरेल,' असा अहवाल या समितीने दिला आहे, असे रेल्वे मंडळाच्या माजी सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 2002-2003 नंतर तयार केलेले सर्व रेल्वे झोन हे राजकीय कारणांसाठी तयार केले गेले असून, रेल्वेची स्वत:ची तशी गरज नव्हती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

भारतीय रेल्वेचे सध्या 17 झोन असून, त्याअंतर्गत 73 विभाग आहेत. 2009 ते 2013 या काळातही झोन आणि विभागासाठी 137 मागण्या आल्या होत्या आणि यातील एकही मागणी वास्तवाला धरून नव्हती, असे समितीने त्यांच्या अहवालात म्हटले होते. नव्या झोनच्या निर्मितीसाठी 205 कोटी रुपये, तर विभागाच्या निर्मितीसाठी 29 कोटी रुपये खर्च येतो. नव्या झोन अथवा विभागासाठी मागणी केलेल्या व्हीआयपींमध्ये खासदार, नेत्यांचे खासगी सचिव, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांचा प्रामुख्याने समावेश आहे. रेल्वे खात्याचे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनीही वेगळ्या झोनची मागणी केली आहे. गडकरींना नागपूरसाठी नवा विभाग, गोहेन यांना ईशान्य भारतासाठी वेगळा झोन, तेंडुलकरला मुंबईसाठी वेगळा झोन, तर थरूर यांनाही तिरुअनंतपूरमसाठी स्वतंत्र झोन हवा आहे. 

Web Title: 170 VIPs demanding new Indian Railways zones, divisions