इसिसच्या दोन संशयितांना हैदराबादमध्ये अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधील सात ठिकाणांवर छापा टाकला होते. यात इसिसशी संबंध असलेल्या आठ जणांची चौकशी करण्यात आली होती. तपासाअंती अब्दुल्ला बासिथ व अब्दुल कादीर यांचे इसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

हैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात घेतले. अब्दुल्ला बासिथ (वय 24) आणि अब्दुल कादीर (वय 19) अशी या संशयितांची नावे असून राष्ट्रीय तपासयंत्रणेने यांच्यासह आठ जणांची चौकशी केली होती.

राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधील सात ठिकाणांवर छापा टाकला होते. यात इसिसशी संबंध असलेल्या आठ जणांची चौकशी करण्यात आली होती. तपासाअंती अब्दुल्ला बासिथ व अब्दुल कादीर यांचे इसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. इसिस संघटनेसाठी नवीन तरूणांची भरती व भारतात दहशतवादी कारवायांचा कट केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपासयंत्रणेचे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी दिली.

अब्दुल्ला बासिथ याला यापूर्वी 2014 व 2015 मध्येही अटक झाली होती. यापूर्वी त्याने सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना अटक केली होती. बासिथसह चारजण सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, पण त्यावेळी त्यांचे वय कमी असल्याने समुपदेशन करून सोडून देण्यात आले होते. 2015 मध्ये बासिथ पुन्हा भावासोबत सिरीयाला जायच्या प्रयत्नात असताना विमानतळावर पकडला गेला होता. त्यानंतर तो सोशल मीडियाद्वारे इसिसच्या संपर्कात होता, हे समोर आले. त्यामुळे त्याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली.

बासिथ, कादीरसह चौकशी केलेल्या पाचही तरुणांचे मोबाईल, लॅपटॉप व इतर सामान तपासयंत्रणेने जप्त केले आहे.

Web Title: 2 arrested in hyderabad for ISIS connection