राजधानीत डिझेलवर चालणाऱ्या 15 वर्षांपूर्वीच्या वाहनांना 'ब्रेक'!

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरुपी "ब्रेक' लागणार असून अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे.

नवी दिल्ली - आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरुपी "ब्रेक' लागणार असून अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील वाहतूक विभागाला डिझेलवर चालणाऱ्या पंधरा वर्षांपूर्वीच्या 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी वाहतूक विभागाने या वाहनांची यादी वाहतूक पोलिसांना पाठविल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने दिली. त्या यादीत वाहनाचे नाव, वाहनधारकाचे नाव, नोंदणी क्रमांक आणि पत्त्याचाही समावेश आहे. तसेच यादीत संबंधित वाहन कोणत्या वाहतूक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंद केलेले आहे त्याचीही माहिती आहे.

'आतापर्यंत 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही वाहने कायद्याने रस्त्यावर चालविता येणार नाहीत. तसेच या वाहनांचे रस्त्यावर पार्किंगही करता येणार नाही. एवढेच नव्हे तर 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या सर्वच वाहनांची यादी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आले की या वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे,' अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. वाहतूक विभागाने नोंदणी रद्द झालेली पंधरा वर्षांपूर्वीची वाहने पार्क करण्यासाठी 21 ठिकाणे उपलब्ध करून दिली आहे. सद्यस्थितीत या 21 ठिकाणांवर एकावेळी प्रत्येकी साधारण 1000-1200 वाहने लावण्याची सुविधा आहे. त्यामुळे विभागाने या कामासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

Web Title: 2 lakh heavy diesel vehicles to go off Delhi roads today