समुद्रात 20 जण बुडाले; 8 जण ठार, इतरांचा शोध सुरु (व्हिडिओ)

चैतन्य जोशी
सोमवार, 21 जानेवारी 2019

गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. आणखी किमान 5 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कारवार- गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. आणखी किमान 5 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सापडलेल्या मृतदेहापैकी एकाची ओळख पटली असून तो मृतदेह नीलेश पेडणेकर (मुंबई)यांचा असल्याची माहिती कारवार पोलिसांनी दिली. कारवारपासून समुद्रात चार किलोमीटरवर हे बेट आहे. तेथे दरवर्षी नरसिंहाची जत्रा असते. कारवारवर सौंदे यांचे राज्य असताना खालसा झालेल्या विजापूर संस्थानच्या सैनिकांना त्यांनी कारवारमध्ये आश्रय दिल्याचे सांगण्यात येते. हे सैनिक येताना आपल्यासोबत नरसिंहाची मूर्ती घेऊन आले. नरसिंह मंदिर कारवारमधील कडवाड येथे आहे. जत्रेसाठी ती मूर्ती बेटावर नेऊन दुसऱ्या दिवशी परत आणली जाते. या निर्मनुष्य बेटावर केवळ मंदिर आणि एक रिसॉर्ट आहे. या जत्रेसाठी शेकडो भाविक गोवा, कर्नाटक परिसरातून जातात. त्यासाठी एरव्ही मच्छीमारीसाठी आणि जल पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या होड्या कारवारड्या कोडीबाग आणि बैतखोल येथून निघतात.

आज बेटावर जाऊन परतण्यासाठी माणशी शंभर रुपये आकारण्यात येत होते. सकाळपासूनच शेकडो भाविक बेटावर जा ये करत होते. त्यापेैकी एक होडी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समुद्रातील लाटेच्या तडाख्याने उलटली. त्या होडीत 15 जणांच्या बसण्याची व्यवस्था होती. होडीला इंजिनही होते. मात्र त्यावेळी त्या होडीत 20- 25 होते अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. होडी बुडाल्यानंतर स्थानिक मच्छीमार आणि किनारी पोलिस यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तत्काळ 11 जणांना वाचवण्यात यश मिळवले. त्यांना उपचारासाठी कारवारच्या जिल्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. शोध मोहिमेत आठ जणांचे मृतदेह सापडले तेही जिल्हा दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

उर्वरीत जणांचा शोध सुरु आहे. होडीत नेमके कितीजण होते याची नेमकी माहिती मिळत नसल्याने शोध सुरुच ठेवण्यात आला आहे.

Web Title: 20 people drown in the sea 8 people killed