पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी लखनौत 22 जण ताब्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

आम्ही 22 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा यंत्रणेचा भेद होण्याची शक्‍यता होती. समाजवादी पक्षाच्या तरुण नेत्यांचाही समावेश ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये आहे

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शहरातील दौऱ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित मोदी यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याची, तसेच पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याची शक्‍यता होती.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक दीपक कुमार म्हणाले, ""आम्ही 22 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा यंत्रणेचा भेद होण्याची शक्‍यता होती. समाजवादी पक्षाच्या तरुण नेत्यांचाही समावेश ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये आहे.'' याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावेळी 7 जूनला विद्यार्थ्यांनी वाहनांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते.

गेल्या वर्षी डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठात कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींसमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पंतप्रधान जाणार असलेल्या मार्गांवर सुरक्षा दले तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही बसवून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.

Web Title: 22 arrested in UP