बॅंकांची 25 टक्के एटीएम म्हणजे खुली तिजोरी

पीटीआय
रविवार, 22 जुलै 2018

सरकारी बॅंकांद्वारा संचलित सुमारे 74 टक्के एटीएम ही कालबाह्य झालेल्या सॉफ्टवेअरवर सुरू आहेत. यापैकी 25 टक्के एटीएम फसवणुकीच्या दृष्टीने पूर्णपणे असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली- सरकारी बॅंकांद्वारा संचलित सुमारे 74 टक्के एटीएम ही कालबाह्य झालेल्या सॉफ्टवेअरवर सुरू आहेत. यापैकी 25 टक्के एटीएम फसवणुकीच्या दृष्टीने पूर्णपणे असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सरकारी बॅंकांबाबत संसदेत उपस्थित एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान ही बाब समोर आली. बहुतांशी "एटीएम'मध्ये अद्याप कालबाह्य ठरलेल्या सॉफ्टवेअरचा वापर होत असून, सुरक्षेच्या ठोस उपायांअभावी या एटीएममध्ये गडबड होऊ शकते, अशी शक्‍यता सरकारने या वेळी व्यक्त केली. जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत डेबिट, क्रेडिट कार्डसंदर्भात 25 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, या कालावधीत झालेल्या एकूण 861 कोटी व्यवहारांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी असल्याची माहितीही सरकारने संसदेत दिली. 

दरम्यान, खासगी बॅंकांच्या एटीएमच्या सुरक्षेबाबत या वेळी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. एटीएम फ्रॉडबाबत मध्यंतरी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर रिझर्व बॅंकेने मार्गदर्शक सूचना जारी करीत संबंधित बॅंकांना सॉफ्टवेअर अपडेट करून घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यासाठी निश्‍चित केलेल्या कालावधीत हे काम पूर्ण करणे अशक्‍य असल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे. 

"एटीएम'ची सद्य:स्थिती 
25 टक्के ः पूर्णपणे असुरक्षित 
84 टक्के ः कालबाह्य सॉफ्टवेअरचा वापर 

Web Title: 25% ATMs of public sector banks may be vulnerable to fraud