तमिळनाडूत पावसाचा हाहाकार; बळींची संख्या २५ वर

वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  •  कोईमतूरमध्ये भिंत पडल्याने दुर्घटना
  •  पुद्दुचेरीतही मुसळधार

कोईमतूर : तमिळनाडूत कोईमतूरजवळील नादूर गावात सोमवारी भिंत पडून 17 जणांचा मृत्यू झाला. भिंत पडली तेव्हा हे सर्वजण झोपेत होते. तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तुतीकोरिन, कुड्डलोर व तिरुनेलवेली जिल्ह्यात सुमारे एक हजार नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यातील मेट्टुपालयम नादूरमध्ये पावसामुळे 15 फूट उंचीची भिंत कोसळली. भिंतीखाली गाडले गेल्याने दोन लहान मुले, दहा महिलांसह 17 जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस व शोध पथकासह अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्याचा घोषणा सरकारने आज केली. कोईमतूरचे जिल्हाधिकारी के. राजामणी यांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा ही सीमाभिंती बेकायदा उभारण्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. चेन्नई व जवळील चेंगलपेट, कांचीपुरम जिल्ह्यात अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. हवामान विभागाने राज्यात मोठ्या पावसाचा इशारा दिला असल्याने अनेक जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. मद्रास विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठांची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

पुद्दुचेरीतील शंकराभरणी नदी काठावरील ग्रामस्थांना पुराचा इशारा काल दिला होता. कुड्डलोर जिल्ह्यातील सखल भागातीस 800 रहिवशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसामुळे रोजंदारीवरील मजुरांना कामावर जाणे अशक्‍य झाले होते. अनेक भागांत पाणी साचल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. शेतातही पिकांमध्येही पाणी साचले.

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

दोन दिवस पावसाचे
क्षेत्रीय चक्रीवादळ सूचना केंद्राचे संचालक एन. पुविआरासन यांनी दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडूत पुढील 24 ते 48 तासांत हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. रामनाथपुरम, तिरुनेलवली, तुतीकोरिन, वेल्लोर, तिरुवल्लूर आदी जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वारे वाहण्याची शक्‍यता असल्याने लक्षद्वीप, केर कोमोरिन या भागात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा पुविआरासन यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 dead in Tamil Nadu rain