
Disaster Management : नैसर्गिक आपत्तींमुळे २५ लाख लोक विस्थापित
नवी दिल्ली : महापूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर होऊ लागले असून २०२२ मध्ये तब्बल २५ लाख लोक विस्थापित झाल्याची धक्कादायक बाब जिनिव्हातील ‘इंटर्नल डिसप्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर’ने तयार केलेल्या अहवालातून उघड झाली आहे.
केवळ दक्षिण आशियाचा विचार केला तर २०२२ मध्ये १ कोटी २५ लाख लोकांना स्थलांतरित व्हावे लागले असून या देशातील ९० टक्के वाहतुकीला पुराचा तडाखा बसल्याचे दिसून आले. पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या तिन्ही देशांना पुराचा जबर फटका बसला असून साधारणपणे जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळामध्ये ही समस्या अधिक तीव्र झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मागील वर्षी मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच भारत आणि बांगलादेशात पुराच्या समस्येने उग्र रूप धारण केल्याचे आढळून आले. आसाम राज्याला मे महिन्यामध्ये पुराचा फटका बसला जूनमध्ये पुन्हा याच भागामध्ये पूर आला होता. त्यामुळे या राज्यामध्ये तब्बल पन्नास लाख लोकांना पुराच्या आपत्तीचा सामना करावा लागला. भारतामध्ये मे महिन्यामध्ये अनेक ठिकाणांवर झालेल्या अतिवृष्टीमुळे बांगलादेशातील अनेक नद्यांना महापूर आल्याचे दिसून आले. यामुळे तब्बल ५ हजार ५०० लोकांना विस्थापित व्हावे लागले.
वादळाचे संकट मोठे
दक्षिण आशियाला २०२२ मध्ये वादळाचा देखील जबर तडाखा बसला असून यामुळे दहा लाखांपेक्षाही अधिक लोक स्थलांतरित झाले होते. ‘सितरंग’ वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील ६६ हजार लोक विस्थापित झाले. ‘असनी’ वादळामुळे आंध्रप्रदेशात दीड हजार आणि ‘मांदौस’ वादळामुळे तमिळनाडूत साडेनऊ हजार लोकांना स्थलांतरित व्हावे लागले.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपत्तीत वाढ
हा अहवाल तयार करताना छोट्या आपत्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांचा कोठेही विचार करण्यात आलेला नाही. यामुळे देखील स्थलांतर झाल्याचे दिसून आले आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भविष्यामध्ये भारतातील नैसर्गिक आपत्तींची संख्या अनेक पटींना वाढत जाणार असून त्याला जागतिक तापमानवाढ कारणीभूत ठरणार असल्याचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गांधीनगरमधील संशोधकांनी म्हटले आहे
वादळांचा कालावधी वाढला
जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणातील अनिश्चितता वाढत चालली असून यामुळे वादळे निर्माण होण्याचे, विजा कोसळण्याचे आणि मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळांची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
नैसर्गिक आपत्तींचे बळी
वर्ष - मृत्यू
२०२२ - २ हजार २२७
२०२१ - १ हजार ७५०
२०२० - १ हजार ३३८