भारतात 2015 मध्ये प्रदूषणामुळे 25 लाख नागरिकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

प्रदूषणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतो याची लोकांना जाणीव नाही. आजारी वा मृत व्यक्ती अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकत नाहीत. 
-रिचर्ड फुलर, प्यूअर अर्थचे प्रमुख.

नवी दिल्ली : हवा आणि पाण्यातील प्रदूषणामुळे जगभरात युद्ध वा रक्तपातापेक्षा अधिक बळी नोंदले जात आहेत. प्रदूषणामुळे मरणाऱ्यांची संख्या धूम्रपान, भूक वा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक आहे. एड्‌स, टीबी आणि मलेरियाने मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. 

द लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालात ही बाब स्पष्टपणे पुढे आली आहे. सन 2015 मध्ये 90 लाख जणांचा प्रदूषणातील विषारी द्रव्यांमुळे उद्‌भवलेल्या रोगांनी मृत्यू झाला. प्रदूषणामुळे होणारे मृत्यू, आजार तसेच त्यांच्याशी लढण्याऱ्या यंत्रणेची उलाढालही अब्जावधीच्या घरात आहे. या तीन पातळीवर प्रदूषणाशी लढण्यात जागतिक अर्थव्यवस्थेमधील 6.2 टक्के रक्कम खर्ची पडते, असाही अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे. 

"प्रदूषणाचा आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. परंतु, पर्यावरण असंतुलन वा एड्‌सला जेवढे महत्त्व देऊन त्यावर खर्च केला जातो तेवढा प्रदूषणावर केला जात नाही' असे न्यूयॉर्क येथील अभ्यासक तसेच हा अहवाल देणारे प्रमुख फिलिप लॅंड्रिगन यांनी म्हटले आहे. ते माउंट सेनई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिन येथील ग्लोबल हेल्थ विभागाचे अधिष्ठाता आहेत. सर्व प्रकारच्या प्रदूणषामुळे उद्‌भवलेले रोग आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूचे आकडे या अहवालाच्या माध्यमातून प्रथमच एकत्रितपणे पुढे आले आहेत. "प्रदूषणाकडे तुकड्या-तुकड्याने बघितले जात असल्याने ही समस्या किती भयावह आहे, याची जाणीव होत नाही,' असेही त्यांचे म्हणणे आहे. 
वाहतूक आणि लहान-मोठी आग यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे सन 2015 मध्ये तब्बल 65 लाख जणांचा मृत्यू झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर पाण्यातील प्रदूषणामुळे उद्‌भवणाऱ्या पोटाच्या विकारांमुळे तब्बल 18 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

सन 2015 मध्ये प्रदूषणामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 25 लाख मृत्यू भारतात झाले असून 18 लाख मृत्यू चीनमध्ये झाले आहेत. बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, उत्तर सुदान आणि हैती या देशांमधील एकूण अपमृत्यूंपैकी वीस टक्के मृत्यू हे प्रदूषणामुळे झाले आहेत. सहारा प्रांतातील काही आफ्रिकन देशांमध्ये प्रदूषण मोजण्याची यंत्रणाच अद्याप उभारण्यात आलेली नाही. जमिनीच्या प्रदूषणाकडे अजूनही पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. जमीन प्रदूषित करणाऱ्या काही घातक द्रव्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. ही द्रव्ये सुरक्षित आहेत अथवा नाहीत याची चाचणी सन 1950 नंतर झालेलीच नाही. 

प्रदूषणामुळे होणारे जवळपास 92 टक्के मृत्यू उत्पन्नाची साधने कमी असलेल्या विकसनशील देशांमधील आहेत. या देशांमधील पर्यावरणाशी संबंधित कायदे कुचकामी असून बहुतेक वेळ भांडवलदार सरकारवर दबाव टाकून कायदे आपल्या फायद्यासाठी बदलून घेतात, असे आढळून असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशातील पायाभूत सोयी वाढविणे आणि नागरिकांना दारिद्य्रातून वर काढणे हेच या देशांमधील सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे प्रदूषणाकडे दुर्लक्ष होते. श्रीमंत देशांमधील गरिबांनाही प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे आढळून आले आहे. 

प्रदूषणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतो याची लोकांना जाणीव नाही. आजारी वा मृत व्यक्ती अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकत नाहीत. 
-रिचर्ड फुलर, प्यूअर अर्थचे प्रमुख.
 

Web Title: 2.5 million died due to pollution in India in 2015, says Lancet study