25 हजार होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड; योगी सरकारचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

- पंचवीस हजार होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड
- उत्तर प्रदेश सरकारकडून डच्चू

लखनौ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गृह रक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या बोजामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 25 हजार होमगार्डना मंगळवारी नोकरीतून काढून टाकले. सणासुदीच्या काळातच होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत गृहरक्षक दलाच्या 25 हजार जवानांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. पी. जोगदंड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. होमगार्डच्या सेवेचा कालावधी प्रत्येक महिन्यात 25 वरून 15 दिवस केल्याने 99 हजारांपेक्षा जास्त होमगार्डना निश्‍चित रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. राज्यातील आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये होमगार्डची मदत मुख्यतः वाहतूक नियमनासाठी घेतली जाते. त्यांची संख्या कमी केलेल्या वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण होण्याती शक्‍य वर्तविली जात आहे. राज्यातील गृह विभाने गृह रक्षक दलात गेल्या वर्षीच 25 हजार जणांची भरती केली होती. या आधी होमगार्डना 500 रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येत असे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो 672 रुपये करण्यात आला होता. त्यांना मासिक वेतनाऐवजी कामाच्या दिवसांवर मानधन देण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 thousand home guards terminated in UP