पंचवीस हजार शाडूच्या "श्री'मूर्तींची बेळगावात नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती बनविण्यावर मर्यादा येत आहेत. 

बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती बनविण्यावर मर्यादा येत आहेत. 

बेळगाव शहरातील मूर्तीकार विविध प्रकारच्या आकर्षक श्रीमूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे शहरासह पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाच्या अनेक भागातून श्रीमूर्ती बनविण्यासाठी आगाऊ नोंदणी केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसवरील निर्बंधामुळे शाडूच्या श्रीमूर्तींकडे नागरीकांचा कल वाढला आहे. तसेच शहर व ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे शाडू व इतर मातीपासून बनविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक श्रीमूर्तींसाठी मागणी वाढल्याचे नोंदणीवरून दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध संघटना पर्यावरणपूरक श्रीमूर्तींसाठी जनजागृती करीत आहेत. 

शाडूची श्रीमूर्ती हवी असल्यास अगोदर मूर्तिकारांकडे नोंदणी करावी लागते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा नोंदणी जास्त प्रमाणात होत आहे. पाण्यात सहजतेने विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक अशा मूर्तीची क्रेझ शहरवासियांमध्ये पहावयास मिळत असली, तरी शाडू अधिक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मूर्तिकारांना अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत.

खानापूर तालुक्‍यातील गर्लगुंजी, निडगल आदी गावांमधून शाडू आणून श्रीमूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांनी लक्ष दिले आहे. शहरात सर्वत्र शाडूपासून बनविलेल्या श्रीमूर्ती प्रतिष्ठापित केल्या जाव्यात, यासाठी शाडू मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. 
 

पर्यावरणपूरक अशा शाडूपासून बनविलेल्या श्रीमूर्तींची नोंदणी वाढली आहे. परंतु, शाडूचा मोठा तुटवडा आहे. यासाठी प्रशासनाने शाडू उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना आखावी. शाडू मुबलक मिळाल्यास अधिक प्रमाणात शाडूच्या श्रीमूर्ती बनविता येतील. 
- किरण पाटील,
मूर्तिकार, काकती 

स्थानिक मूर्तिकारांना फटका 
शाडू आवश्‍यकतेप्रमाणे उपलब्ध होत नसल्यामुळे शहर आणि परिसरातील मूर्तिकारांना अधिक प्रमाणात मूर्ती बनविता येत नाहीत. परिणामी, अनेक व्यापारी महाराष्ट्राच्या विविध भागात तयार होणाऱ्या शाडूच्या मूर्ती शहरात आणून विक्री करतात. त्यामुळे शाडूच्या मूर्तीसाठी गणेशभक्‍तांना अनेक पर्याय उपलब्ध होत असून स्थानिक मूर्तिकारांना त्याचा फटका बसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 thousand Shadu Ganesh Idol registered in Belgaum