कर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी लष्कर, नौदल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), गृह रक्षक दल युद्धपातळीवर काम करीत आहे. 

बंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी लष्कर, नौदल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), गृह रक्षक दल युद्धपातळीवर काम करीत आहे. 

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शनिवारी उच्चस्तरिय बैठक घेतली. तसेच पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांच्या उपायुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. कोडागू जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथे खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे.

उत्तर कन्नडा, उडुपी, मंगळूर, चिकमंगळूर, हसन व शिवमोगा या जिल्ह्यांत आज पावसाने विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला. लष्कराच्या एम 17 या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. कोडागू जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना या हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात येत आहे. कोडागूमध्ये पावसामुळे मोठी हानी झाली आहे. भूस्खलनामुळे 500 घरांचे नुकसान झाले असून, पुराचा फटका अनेक भागांना बसला आहे, असे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. आवश्‍कता भासल्यास मदतीसाठी पंतप्रधानांशी संपर्क साधू. लष्कराचे 75, नौदलाचे 12 व गृहरक्षक व अग्निशामक दलाचे 525 जवान व नागरी बचाव पथकाचे 45 जण मदतकार्य करीत आहेत. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 200 कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. - एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री कर्नाटक 

Web Title: 2500 people rescued from the flood in Karnataka