आंध्र-ओडिशा सीमेवर आणखी 3 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

मलकानगिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर आंध्र-ओडिशा सीमेवरील ही नजीकच्या काळातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

विजयवाडा - आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर सुरक्षा जवानांनी आज (मंगळवार) पहाटे पुन्हा एकदा कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाले. सोमवारी गोळीबारात दोन म्होरके आणि सात महिलांसह 24 नक्षलवादी मारले गेले होते.

या कारवाईमुळे नक्षलवाद्यांची मोठी हानी झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सोमवारी नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेला अबुबकर हा जवान हुतात्मा झाला. आंध्र प्रदेशच्या "ग्रे हाउंड' या नक्षलवादविरोधी विशेष पथकाने ओडिशा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. 

ओडिशामधील मलकानगिरी जिल्ह्यात दोन्ही पथकांकडून नियमित शोध मोहीम सुरू असताना त्यांच्यात आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी चकमक झाली. पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या 24 जणांमध्ये गजर्ला रवी ऊर्फ उदय आणि चलपती ऊर्फ अप्पा राव या दोन म्होरक्‍यांचा समावेश होता. रवी हा आंध्र-ओडिशा सीमा भागातील संघटनेचा सचिव होता, तर चलपती हा पूर्व विभागाचा सचिव होता. चलपतीची पत्नी अरुणा आणि आणखी एक म्होरक्‍या बाकुरी वेंकट रामण मूर्ती हेदेखील या वेळी ठार झाले. तसेच, नक्षलवाद्यांचा वरिष्ठ म्होरक्‍या रामकृष्ण याचा मुलगाही या वेळी मारला गेल्याचे समजते. चकमकीनंतर पोलिसांनी तेथून तीन एके-47 बंदुका, चार स्वयंचलित रायफल्स, लॅपटॉप, अनेक लहान शस्त्रे, दारूगोळा आणि सुमारे सव्वा दोन लाख रुपये जप्त केले. मलकानगिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर आंध्र-ओडिशा सीमेवरील ही नजीकच्या काळातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. आज सकाळीही पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: 3 Maoists killed in Malkangiri encounter