एका बाळाचे तीन बाप? पोलिसांना प्रश्न खरा कोण....

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

एका युवतीने बाळाला जन्म दिला. पण, एक, दोन नव्हे तर तिघांनी आपणच या बाळाचे बाप असल्याचा दावा केला.

कोलकताः एका युवतीने बाळाला जन्म दिला. पण, एक, दोन नव्हे तर तिघांनी आपणच या बाळाचे बाप असल्याचा दावा केला. बाळाच्या बापावरून हाणामारीही झाली, प्रकरण अखेर पोलिसांकडे गेले. पोलिसांनाही प्रश्न पडला पण या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले.

शनिवारी (ता. 20) एका 21 वर्षीय युवती संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्रसुतीसाठी आयआरआयएस रुग्णालयात दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत तिची आई व एक तरुण होता. प्रसुतीचा अर्ज भरताना सोबतच्या युवकाने पैसेही भरले आणि आपण युवतीचा पती असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, त्याचवेळी एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली आणि मी युवतीचा पती असून, तिला भेटायचे असल्याचे सांगू लागला.

रुग्णालयातील कर्मचारी यामुळे गोंधळात पडले. कर्मचाऱयांनी अर्ज भरलेल्या व्यक्तीची माहिती दिली व अर्जही दाखवला. पण, ती व्यक्ती ऐकून घ्यायला तयार नव्हती. दरम्यानच्या काळात युवतीला प्रसुतीसाठी नेण्यात आले होते व मुलगी झाल्याचे सांगण्यात आले. दुसऱया व्यक्तीला कुटुंबाकडे नेण्यात आले. दोघेही युवक समोरासमोर आले व आपणच या बाळाचे बाप असल्याचे सांगू लागले. प्रकरण चिघळत गेले. दोघांची हाणामारी सुरू झाली. रुग्णालयातील कर्मचाऱयांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दोघांकडे विवाहाचा पुरावा मागितला. दुसऱ्या व्यक्तीने संध्याकाळी विवाहाचे प्रमाणपत्र आणून पोलिसांना दाखवले. मात्र, दुसरी व्यक्ती प्रमाणपत्र दाखवू शकली नाही. पोलिसांनी खरडपट्टी केल्यावर आपण फक्त मित्र असल्याची कबुली दिली. दरम्यानच्या काळात युवती बेशुद्ध होती. पहिल्या दोन युवकांना शांत करत असतानाच आणखी एक युवक तिथे आला आणि मीच बाळाचा बाप असल्याचे सांगू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यावेळी तो म्हणाला, युवती माझी मैत्रीण आहे. आमचा विवाह झाला नसला तरी बाळाचा बाप मीच आहे, असा दावा तिसरी व्यक्ती करू लागली. या सर्व गोंधळामुळे पोलिसही गोंधळून गेले.

सर्व गोंधळ सुरू असताना युवती शुद्धीवर आली. पोलिस अधिकाऱयांना माहिती देताना युवती म्हणाली, 'दुसरा युवक मुलीचा बाप असल्याचे सांगितले. शिवाय, एप्रिल महिन्यात आमचा विवाह झाल्याचेही सांगितले. आमचे प्रकरण थोडे वेगळे आहे. युवकाने पत्नी म्हणून आपला स्वीकार करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याने विवाह केला.' तपासादरम्यान, युवक म्हणाला, पत्नीच्या व्हॉट्सऍप स्टेटसनंतर मी बाप झाल्याची माहिती मिळाली म्हणून आलो.' दरम्यान, हा सर्व गोंधळ सुरू असताना तिसऱया युवकाने मात्र काढता पाय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 men claim to be father of woman's newborn girl in Kolkata