पत्नीवर संशय म्हणून नेमले होते 'डिटेक्टीव्ह'

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्लीः एक महिला खरेदीसह मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडते. परंतु, दिवसभर आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यामुळे ती घाबरते व नातेवाईकांना फोनवरून माहिती देते. तिघांना पकडल्यानंतर चौकशीवेळी हे खासगी 'डिटेक्टीव्ह' असल्याचे उघड होते. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खासगी 'डिटेक्टीव्ह'ला पतीनेच नेमले होते, अशी माहिती तपासात पुढे आली.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला घरगुती साहित्य विकत घेण्यासाठी व मैत्रिणींना भेटण्यासाठी पंजाब बाग परिसरामधून बाहेर पडली होती. कॅनोट प्लेस परिसरात असताना तीन जण आपला सकाळपासून पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. महिलेने तिच्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर काही वेळामध्ये खान मार्केट परिसरामध्ये त्या महिलेचे नातेवाईक तिच्या मदतीसाठी आले. महिलेने आरडाओरड करुन या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. बाजारामधील स्थानिक दुकानदारांच्या मदतीने या तिघांनाही पकडण्यात यश आले. यावेळी एका दुकानदाराने पोलिसांना फोन केला. घटनास्थळी काही वेळातच पोलिस दाखल झाले व हेमंत अग्रवाल (28), बाबार अली (19) आणि अमित (22) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान महिलेच्या पतीने आपल्याला 'डिटेक्टीव्ह' म्हणून नेमल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्व दिल्लीमधील शाहदरा येथे हेमंत खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सी चालवत आहे. बाबार आणि अमित हे दोघे हेमंतला मदत करतात. महिलेच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली आहे. महिलेलाही चौकशीसाठी पोलिस स्थानकात नेण्यात आले. चौकशी दरम्यान या तिघांनीही आपण खासगी डिटेक्टीव्ह असल्याचे सांगितले. शिवाय, या महिलेच्या पतीनेच तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी तत्काळ महिलेच्या पतीला पोलिस स्थानकामध्ये बोलवले. यावेळी पतीने पोलिसांसमोर पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिघांना नेमल्याची कुबली दिली, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: 3 men held for stalking woman turn out to be private detectives hired by her husband at delhi