भाजप प्रवेशासाठी काँग्रेसच्या मंत्र्याला 30 कोटींची 'ऑफर'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

- एकीकडे युतीच्या आमदारांना फोडून घेण्यासाठी कोट्यावधींची ऑफर देण्यात येत असल्याचा विधिमंडळात आरोप होत असला तरी भाजपची 'ऑपरेशन कमळ' मोहीम अद्याप थांबलेली दिसत नाही.

बंगळुरू : एकीकडे युतीच्या आमदारांना फोडून घेण्यासाठी कोट्यावधींची ऑफर देण्यात येत असल्याचा विधिमंडळात आरोप होत असला तरी भाजपची 'ऑपरेशन कमळ' मोहीम अद्याप थांबलेली दिसत नाही. मंत्री रहीम खान यांना फोन करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन करण्यात आले. भाजपच्या खासदार शोभा करंदलांजे यांनी मंत्री रहीम खान यांना फोन करून 30 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांनी केला.

मंत्री रहीम खान यांना 30 कोटी रुपयांबरोबरच मंत्रीपद व उत्तर कर्नाटकातील एक प्रभावी नेते म्हणून पुढे आणण्याची ग्वाही देण्यात आल्याचे समजते. ऑपरेशन कमळच्या भीतीमुळे कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या आमदारांना बंगळूरातील ताज विवंत रेस्टॉरंटमध्ये ठेवले आहे. भाजपच्या या प्रयत्नामुळे राजकीय परिस्थिती अधिक बिकट होत आहे. ईश्वर खंड्रे यांनी ऑपरेशन कमळ मोहीम लोकशाही व्यवस्थेला मारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

युती पक्षाच्या आमदारांना धमकी, भीती व आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांना आमदारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आमदारांनी त्यांच्या विनंतीला नकार दिला तरी विविध मार्गाने त्यांच्यावर दबाव आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

खंड्रे म्हणाले, आमचे आमदार धमक्‍यांना घाबरणार नाहीत. कॉंग्रेस सोडून जाणार नाहीत. जे गेले आहेत त्यांनी वेळीच सावध होऊन स्वपक्षात परत यावे. भाजपने चालविलेल्या घोडेबाजाराकडे राज्यापालांचे लक्ष का नाही, असा सवाल करून भाजप राजभवनाचा दुरूपयोग करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 crores offer to Congress minister for BJP entry