एनएसजीकडे 300 स्थळांचा प्लॅन 

संतोष शाळिग्राम 
शनिवार, 5 मे 2018

नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध वास्तू वा स्थळांवरील दहशतवादी हल्ले आता तत्काळ हाणून पाडता येतील. त्यासाठी "नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड'ने (एनएसजी) देशातील 300 ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या अंतर्गत रचनांची मॉडेल तयार केली आहेत. त्यानुसार प्रतिहल्ल्याचे नियोजन करणे सहज शक्‍य होणार आहे. 

नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध वास्तू वा स्थळांवरील दहशतवादी हल्ले आता तत्काळ हाणून पाडता येतील. त्यासाठी "नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड'ने (एनएसजी) देशातील 300 ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या अंतर्गत रचनांची मॉडेल तयार केली आहेत. त्यानुसार प्रतिहल्ल्याचे नियोजन करणे सहज शक्‍य होणार आहे. 

मुंबईत 26/11 च्या हल्ल्यावेळी लक्ष्य करण्यात आलेल्या इमारतीची अंतर्गत रचना माहिती नसल्याने पोलिस आणि एनएसजीला प्रतिकार करताना अडचणी आल्या होत्या. पण आता कोणताही हल्ला काही वेळात रोखता येऊ शकेल. देशात महत्त्वाची स्थळे, इमारतींची यादी एनएसजीने तयार केली आहे. त्यांची अंतर्गत रचना समजण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील तीनशे इमारतींची मॉडेल बनविली आहेत. या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तर अंतर्गत रचना माहिती असल्याने आत घूसून दहशतवाद्यांचा शोध आणि त्यांचा खात्मा एनएसजीला तत्काळ करता येणार आहे. 

नवी दिल्लीतील एनएसजीच्या मुख्यालयाचे महानिरीक्षक प्रमोद फळणीकर यांनी ही माहिती "सकाळ'ला दिली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी इमारती आणि स्थळांची नावे मात्र उघड केली नाहीत. 

पाच शहरांत एनएसजी 
हल्ल्यांच्या ठिकाणी जवानांना शक्‍य तितक्‍या लवकर पोचता यावे म्हणून देशभरातील पाच शहरांमध्ये एनएसजी हब तयार करण्यात आली आहेत. मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि गांधीनगर या शहरांचा त्यात समावेश आहे. हल्ला झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी असलेले कमांडो तत्काळ कारवाई करू शकतील, असे फळणीकर यांनी सांगितले. 

हरियाणातील गुरूग्रामजवळ मानेसर येथे एनएसजीचे विस्तीर्ण प्रशिक्षण केंद्र आहे. विमान हायजॅक विरोधी मोहिमांचे प्रशिक्षण, हल्लेखोर श्वान पथकांना या ठिकाणी प्रशिक्षित केल्याचे सांगताना राज्याराज्यांतील पोलिस दलांच्या क्षमता विकासाचे काम एनएसजी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

दहशतवादविरोधी हल्ल्यात श्‍वानांचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण ठरतो. त्यांनाही जवानांसारखे कठीण प्रशिक्षण दिले जाते. आता माणसाप्रमाणे श्‍वानांना वायरलेस यंत्रणेद्वारे सूचना देऊन दहशतवाद्यांना रोखता येणार आहे. त्यासाठी फ्रान्सकडून तंत्रज्ञान खरेदी केले आहे. 
प्रमोद फळणीकर, महानिरीक्षक, एनएसजी मुख्यालय 

तंत्रज्ञानाचा उपयोग 
श्‍वानाच्या कानात वायरलेस संपर्क यंत्रणा आणि त्याच्या डोक्‍याला कॅमेरा अशी ही यंत्रणा आहे. त्याआधारे दहशतवाद्यांच्या तळांचा शोध घेता येईल. श्‍वानांना सूचना देऊन त्यांच्यावर आक्रमकपणे हल्ला चढविता येईल. कमांडोला कॅमेऱ्यामुळे परिस्थिती समजेल आणि त्याच्यावरील हल्ल्याचा धोकाही त्याला परतविता येईल.

Web Title: 300 Places Plan to NSG