मिर्चपूर हत्याकांडप्रकरणी 33 आरोपींना शिक्षा

पीटीआय
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मिर्चपूरमधील घटना भारतीय समाजातील दोन कमतरतांची तीव्र जाणीव करून देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर केला होता, त्यात समता आणि बंधुता हे दोन शब्द होते. याच दोन गोष्टींची कमतरता अद्यापही समाजात जाणवत आहे. 
- दिल्ली उच्च न्यायालय  

नवी दिल्ली : हरियानातील मिर्चपूर येथील दलित हत्याकांडप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलत एकूण 33 आरोपींना दोषी ठरविले. देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली तरी अल्पसंख्यकांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

हरियानातील हिस्सार जिल्ह्यात मिर्चपूर येथे 21 एप्रिल 2010 ला जाट समुदायाच्या काही जणांनी ताराचंद या 60 वर्षांच्या दलित व्यक्तीला आणि त्याच्या शारीरिक विकलांग मुलीला घरासह जिवंत जाळले होते. याप्रकरणी 97 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. स्थानिक न्यायालयाने 15 जणांना शिक्षा सुनावली होती. यातील दोघांचा नंतर मृत्यू झाला. यानंतर शिक्षा सुनावलेल्यांनी शिक्षेविरोधात, तर पोलिसांनी उर्वरित जणांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. आज उच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयाने दोषमुक्त केलेल्यांपैकी आणखी वीस जणांना शिक्षा सुनावली. एकूण 33 दोषींपैकी न्यायालयाने 12 जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित जणांच्या शिक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

जाट आणि दलित समाजातील वादातून ताराचंद आणि त्यांच्या मुलीला जाट समुदायातील काही जणांनी घरात डांबून ठेवत घर पेटवून दिले होते. दलितांना धडा शिकविण्याच्या उद्देशानेच हे हत्याकांड करण्यात आल्याचा पीडितांचा दावा उच्च न्यायालयाने मान्य केला आणि शिक्षा सुनावली.

 
 

Web Title: 33 accused in Mirchpur Murder case