देशातील 34 जणांच्या हत्येचा कट ; आमदाराच्या पीएकडून शस्त्रास्त्र प्रशिक्षण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी देशातील 34 जणांची हत्या करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित अमोल काळे याची डायरी विशेष तपास पथकाला (एसआयटी) सापडली असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने आणखी एका संशयितास अटक केली. 

बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी देशातील 34 जणांची हत्या करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित अमोल काळे याची डायरी विशेष तपास पथकाला (एसआयटी) सापडली असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने आणखी एका संशयितास अटक केली. 

हिंदूविरोधी धोरण व वक्तव्य करणाऱ्या 34 जणांची टप्प्याटप्प्याने हत्या केल्यास हिंदू धर्माविरुद्ध बोलण्याचे साहस कोणी करणार नाही. हिंदू विरोधकांची तोंडे बंद करायची झाल्यास त्यांना संपविणे, हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांचे मत होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, नाटककार व साहित्यिक गिरीश कर्नाड, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ, निडूमामीडी चन्नमल्ल वीरभद्र स्वामी, माजी मंत्री बी. टी. ललिता नायक यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व इतर राज्यांतील विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचल्याचे काळेच्या डायरीवरून समजले आहे. यासाठी तो विविध राज्यांतील आपल्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होता. 
विचारवंत एम. एम. कलबुर्गी, महाराष्ट्रातील नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व देशाच्या विविध भागांतील विचारवंतांवर झालेले हल्ले याच संशयितांकडून झाले असावेत, अशी शंकाही "एसआयटी'ला आहे. 

आमदारांच्या पीएकडून प्रशिक्षण 

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेतील राजेश बंगेरा हा विधान परिषद सदस्या वीणा आचय्या यांचा स्वीय सहायक होता. त्यानेच मारेकऱ्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. बंगेराने काळेला 20 जिवंत गोळ्या दिल्या होत्या. मात्र, त्या गोळ्यांचा लंकेश यांच्या हत्येत वापर करण्यात आला किंवा नाही, याची अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही. बंगेरा शिक्षण खात्यात द्वितीय श्रेणी सहायक होता. तो मूळ मडकेरीचा असून, गेली काही वर्षे परवाना असलेल्या दोन बंदुका तो वापरत होता. याच परवान्यावर तो बंदुकीच्या गोळ्यांची खरेदी करीत होता. त्यांचा तो दुरुपयोग करीत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. 

आणखी एकास अटक 

गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने आणखी एका संशयितास अटक केली. तुमकूर जिल्ह्यातील सिगेहळ्ळी (ता. कुणीगल) येथील सुरेश असे त्याचे नाव असून, लंकेश यांच्या हत्याऱ्यांना त्याने आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हत्येप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.

अमोल काळेसह इतर संशयितांना त्याने आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. लंकेश यांच्या हत्येच्या कटाची माहिती सुरेशला होती. "एसआयटी'ने त्याला तृतीय एसीएमएम न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. 

Web Title: 34 murders in the country Arms training from MLAs PA