४० चपात्या खाऊनही त्याचे पोट भरत नाही; क्वारंटाईन सेंटरमधील कर्मचारी वैतागले

शुक्रवार, 29 मे 2020

भस्म्या रोग झाल्यासारखं जेवण करणाऱ्या या युवकाची भूक पाहून सर्वचजण हैराण झाले आहेत.

पटना : ४० चपात्या आणि दोन प्लेट भात खाऊनही एका तरुणाचे पोट भरत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील कर्मचारीही वैतागले आहेत. बिहारच्या बक्सर येथील क्वांरटाईन सेंटरमधील ही गोष्ट आहे. भस्म्या रोग झाल्यासारखं जेवण करणाऱ्या या युवकाची भूक पाहून सर्वचजण हैराण झाले आहेत. ज्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि व्यवस्थापकांना येथील जेवणाची व्यवस्था करणे अत्यंत अवघड झाले आहे.

या युवकाचे दररोजचे जेवण हे दहा माणसाच्या जेवणाबरोबर असल्याचे अधिकारी सांगतात. अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, या युवकाच्या नाश्त्यात ४० चपात्या आणि दोन प्लेट भाताचा समावेश आहे. एका वेळेस हा युवक ८० लिट्टीचोखा (बिहारी खाद्यपदार्थ) खातो. त्यानंतरही या युवकाचे पोट भरत नाही. अनुप ओझा असे या युवकाचे नाव असून संशयित रुग्ण म्हणून अनुपला मंझवारी क्वांरटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्याच्या खाण्याच्या पद्धतीला कंटाळून अधिकारी अनुपला आज घरी जाण्यासही सांगू शकतात. त्याला राहिलेले काही दिवस घरीच होम क्वारंटाईन करण्यात येऊ शकते. त्याच्यासोबत क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणाऱ्या सोबत्यांचे म्हणणे आहे की काहीच दिवसांपूर्वी खाण्यासाठी लिट्टी बनवण्यात आली होती. जवळपास ८० लिट्टी खाल्यानंतरही अनुपचे पोट भरले नाही. हे चित्र बघून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. अनुपने स्व:त हे सांगितले की, साधारणत: ३० ते ३२ चपात्या तो नाष्ट्यात खातो. शिवाय एका दिवसात २५ लिट्टी एवढे खाऊनही अनुपला पोट भरल्यासारखे वाटत नाही.

अधिकारीही झाले आश्चर्यचकित
जेव्हा येथील क्वांरटाईन सेंटर मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी विचारणा करण्यात आली की, येथील जेवण एवढ्या लवकर का संपते? तेव्हा तेथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि क्वांरटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींकडून सांगण्यात आले की, येथे सध्या अनुप नावाच्या एका खादाड व्यक्तीला क्वांरटाईन करण्यात आले आहे. जेव्हा पासून तो येथे आला आहे. तो बनवण्यात आलेले सगळे अन्न एकटाच खाऊन टाकतो. अनुपच्या या या महाकाय भुकेमुळे वैतागलेल्या स्वयंपाक्याने त्याच्यासाठी स्वंयपाक करण्यास नकार दिला आहे.