Suicides In Armed Forces: धक्कादायक! देशात तीन वर्षांत ४३६ जवानांच्या आत्महत्या; सरकारने संसदेत दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

436 CAPF personnel personnel of central forces committed suicide in last three years Govt tells Rajya Sabha

Suicides In Armed Forces: धक्कादायक! देशात तीन वर्षांत ४३६ जवानांच्या आत्महत्या; सरकारने संसदेत दिली माहिती

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत केंद्रीय दलाच्या ४०० हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्याचे सरकारने संसदेत सांगितले. गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

दरम्यान हे थांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर पावले उचलली जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, CAPF, आसाम रायफल्स आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार , गेल्या 3 वर्षांत 436 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 135, 2021 मध्ये 157 आणि 2020 मध्ये 144 जवानांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.

नित्यानंद राय म्हणाले की, CAPF, आसाम रायफल्स आणि NSG जवानांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत, कर्मचार्‍यांची बदली आणि रजा यासंबंधी पारदर्शक धोरणे बनवून, एखाद्या कर्मचार्‍याने अवघड क्षेत्रात सेवा दिल्यानंतर, शक्य तितक्या पातळीवर जवानांना त्यांच्या आवडीप्रमाणी तैनाती देण्यावर विचार केला जातो.

यासोबतच जवानांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि सैनिक यांच्यात नियमित संवाद साधला जात आहे. कामाच्या तासांवर नियंत्रण ठेवून पुरेशी विश्रांती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही अवघड भागात पोस्टिंग करताना, पूर्वीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी सरकारी निवासस्थान (कुटुंब ठेवण्यासाठी) तसेच उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या वैयक्तिक आणि मानसिक समस्यांचे निवारण करण्यासाठी तज्ञांशी संवाद आयोजित करणे इत्यादींचा समावेश आहे

विशेष म्हणजे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा निमलष्करी दलांमध्ये CRPF, BSF, CISF, ITBP, SSB, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचा समावेश होतो. या दलांची एकत्रित संख्या सुमारे 10 लाख आहे.

दुसरीकडे, गृह मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले की, सरकारने फेब्रुवारी 2023 पर्यंत UAPA च्या चौथ्या शेड्यूल आणि पहिल्या शेड्यूल अंतर्गत 54 दहशतवादी आणि 44 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, या वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत 4 दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :ArmyCRPF