बंगालमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मकर संक्रातीच्या मुहूर्तावर दरवर्षी लाखो भाविक पश्‍चिम बंगालमधील गंगासागर येथे जात असतात. गंगासागर कुंभमेळ्यानंतर देशातील दुसरा सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. शनिवारीही 16 लाख भाविकांनी गंगासागर येथे पवित्र गंगास्नान केले.

कोचुबेरिया (कोलकता, प. बंगाल) - गंगासागर यात्रेवरून परतत असताना कोचुबेरिया येथील नदी किनारी झालेल्या चेंगराचेंगरी सहा भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत.

पश्‍चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील कोचुबेरिया येथील नदी किनारी रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोलकत्याला जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याचदरम्यान भाविकांची झुंबड उडून चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक पोलिस घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांपैकी दोन भाविकांचा जागीच, तर तिघांचा रुग्णालयात दाखल करत असताना मृत्यू झाला. मृतांपैकी सर्व जण मध्यमवयीन असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दुर्घटनाग्रस्तांना राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे पश्‍चिम बंगालचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुब्रता मुखर्जी यांनी सांगितले. गंगासागर हे येथील चिंचोळे बेट असून, येथे जाण्यासाठी धोकादायक रस्ते आहेत. मकर संक्रातीच्या मुहूर्तावर दरवर्षी लाखो भाविक पश्‍चिम बंगालमधील गंगासागर येथे जात असतात. गंगासागर कुंभमेळ्यानंतर देशातील दुसरा सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. शनिवारीही 16 लाख भाविकांनी गंगासागर येथे पवित्र गंगास्नान केले.

Web Title: 6 Elderly Women Die At Bengal's Gangasagar, State Government Denies Stampede