पंजाबमधून सहा किलो हेरॉइन जप्त

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

डी.टी. मालच्या सीमेवरील तपासणी नाक्‍यांवर सीमा सुरक्षा दल आणि स्पेशल टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम सुरू केली होती. या तपासणी मोहिमेदरम्यान झाडाच्या खाली लपवून ठेवलेली हेरॉइनची पाच पाकिटे पिवळ्या पॉलिथिनच्या पिशवित ठेवलेली आढळली

फिरोझपूर (पंजाब) - पंजाबच्या फिरोझपूर आणि अमृतसरमधून आज सहा किलोहून अधिक हेरॉइन जप्त करण्यात आल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली.

पहिल्या घटनेत फिरोझपूरच्या डी.टी. माल सीमेवरील तपासणीनाक्‍याच्या परिसरात एका झाडाच्या खाली पाच किलो पुरून ठेवलेले हेरॉइन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले. पंजाब स्पेशल टास्क फोर्सच्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई करीत हे हेरॉइन जप्त केले, असे या अधिकाऱ्याने सांगितले. डी.टी. मालच्या सीमेवरील तपासणी नाक्‍यांवर सीमा सुरक्षा दल आणि स्पेशल टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम सुरू केली होती. या तपासणी मोहिमेदरम्यान झाडाच्या खाली लपवून ठेवलेली हेरॉइनची पाच पाकिटे पिवळ्या पॉलिथिनच्या पिशवित ठेवलेली आढळली, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या एका घटनेत पंजाब पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अमृतसरमधून 1.45 किलो हेरॉइन जप्त केले. याबाबत पंजाब पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, पंजाब पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने निरीक्षक सुखविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अमृतसरच्या भारत-पाकिस्तान सीमा भागात कारवाई करीत हेरॉइन जप्त केले.

Web Title: 6 Kg heroin seized in Punjab