कुलरनिर्मिती युनिटला भीषण आग : 6 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण छत्तीसगढ आणि बिहारमधील आहेत.

हैदराबाद : येथील अत्तापूर भागात एका लघुउद्योगाच्या युनिटला भीषण आग लागल्याने त्यामध्ये सहा कामगार भाजून मृत्युमुखी पडले. 
आगीमध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण छत्तीसगढ आणि बिहारमधील आहेत. या युनिटमध्ये एअर कुलर आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती केली जाते. त्याच्या बाजूच्या परिसरात रहिवाशांची घरे आहेत. 

आज (बुधवार) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास येथील युनिटमधून धूर निघत असल्याचे एका पोलिस पथकाच्या लक्षात आले. ही आग वेगाने पसरू लागल्याने त्यांनी ताबडतोब अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना कळविले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

"चार अग्निशामक बंबांच्या साह्याने आग विझविण्यात आली आहे. सहाजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उस्मानिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत," असे शमशाबादचे पोलिस उपायुक्त पी.व्ही. पद्मजा यांनी सांगितले. 
 

Web Title: 6 killed as fire breaks out in air cooler manufacturing unit