यूपीत 60 टक्के, तर मणिपूरमध्ये 85 टक्के मतदान

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

लखनौ: उत्तर प्रदेशच्या 17 व्या विधानसभेसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील सात जिल्ह्यांतील 40 जागांसाठीचे मतदान संपले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. या टप्प्यात एकूण 535 उमेदवार मैदानात होते. दरम्यान, येत्या शनिवारी (ता. 11) मतमोजणी होणार आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशच्या 17 व्या विधानसभेसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील सात जिल्ह्यांतील 40 जागांसाठीचे मतदान संपले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. या टप्प्यात एकूण 535 उमेदवार मैदानात होते. दरम्यान, येत्या शनिवारी (ता. 11) मतमोजणी होणार आहे.

मतदानासाठी सकाळपासून लोकांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेला वाराणसी आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचा गाजीपूर जिल्हा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा जनपद चंडौली यांचा समावेश होता. या तिन्ही जिल्ह्यांत या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक आयोगाने नक्षलग्रस्त तीन जागांवरील मतदान सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठेवले होते.

मणिपूरमध्ये विक्रमी मतदान
इंफाळ : मणिपूरच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान पार पडले. मणिपूरच्या 60 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असताना दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी सुमारे 85 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला या मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या विरोधात उभ्या आहेत. इरोम शर्मिला या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मणिपूरमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत 78 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळी सात वाजता 1 हजार 151 मतदान केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्थेत मतदान सुरू झाले. निवडणूक आयोगाने राखीव दलाच्या 280 तुकड्या तैनात केल्या होत्या.

निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागतील
वाराणसी : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे मतदान संपले असून, आता सर्वांचे लक्ष शनिवारच्या निकालाकडे लागले आहे. या राज्यातील राजकीय तज्ज्ञ निवडणुकीच्या संभाव्य निकालाबाबत भाष्य करत असून आकडेवारीच्या आधारात निकालाचा अंदाज बांधताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील निकालाबाबतची उत्सुकता दिसून येत आहे. वाराणसीच्या गल्लीतही ज्योतिष आणि पंडित राजकीय पक्षांच्या भवितव्याबाबत आडाखे बांधताना दिसून येत आहे. ज्येतिषांच्या मते, यूपीचे निकाल धक्कादायक असतील आणि दिग्गज नेत्यांना देखील अनपेक्षित निकालांना सामोरे जावे लागेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: UP to 60 per cent, while 85 per cent of the vote in Manipur