वादळाचे देशभरात 60 बळी, उत्तर भारतासह आंध्र, तेलंगणलाही तडाखा 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे धुळीचे वादळ समग्र वायव्य भारत व्यापेल, अशी शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्‍मीरसह उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतावरही हे वादळ घोंघावू शकते.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडे आंध्र आणि तेलंगणला धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा आज जोरदार तडाखा बसला. देशभरात जोराच्या पावसानेव वादळाने रविवारी (ता.13) 60 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याचा मोठा फटका उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालसह दिल्लीलाही बसला आहे. 

या वादळामुळे दिल्लीत दोन जण मरण पावले असून, अठरा जण जखमी झाले आहेत. दिल्लीमध्ये प्रतितास 109 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहत होते. दिल्लीमध्ये यामुळे अनेक भागांतील झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली होती, तर मेट्रो आणि विमानसेवेलाही याचा मोठा फटका बसला. दिल्लीतील विमानांची चाळीस उड्डाणे यामुळे रद्द करण्यात आली, तर 70 विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

storm

दिल्लीलगतच्या गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद या भागांत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या अवकाळी पावसामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. या वादळी पावसाचा मोठा फटका मेट्रोसेवेलाही बसला असून, नोएडा-द्वारका लाइनवरील मेट्रोसेवा काहीकाळ थांबविण्यात आली होती. 

उत्तर प्रदेशातील विविध भागात या वादळाने साधारण 30 लोकांचे बळी घेतले, तर 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. या वादळामुळे येथील वीजपुरवठा ही खूप वेळासाठी खंडीत करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये पावसाच्या तडाख्यामुळे 12 लोकांचा बळी गेला आहे, तर 15 लोक गंभीर जखमी आहेत. या वादळाचा व पावसाच्या जोरामुळे अनेक घरेही उध्वस्त झाली आहेत. या वादळी पावसाने आंध्र प्रदेशात आठ, तर तेलंगणमध्ये तीन नागरिकांचा बळी घेतला. 

west bengal

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे धुळीचे वादळ समग्र वायव्य भारत व्यापेल, अशी शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्‍मीरसह उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतावरही हे वादळ घोंघावू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील दोन दिवसांत राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची तीव्रता अधिक असेल.

Web Title: 60 people killed as storm rain hit in country Andhra Pradesh West Bengal delhi telanagan affected