रांचीत एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या?

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

झारखंडमधील रांची येथे राहत्या घरात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

रांची - झारखंडमधील रांची येथे राहत्या घरात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
 
रांचीतील कांके भागातील राहत्या घरात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासात हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचे समोर आले असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधीक्षक अनीस गुप्ता यांनी दिली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले.

जुलै महिन्याच्या सुरवातीलाच झारखंडमधील हाझाजीबाग जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केली होती. तर, दिल्लीतील बुराडी भागातही एकाच कुटुंबातील अकरा जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. अंधश्रद्धेतून या सर्वांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असे नंतर पोलिसांच्या तपासातून पुढे आले होते. 

कर्जफेडीची होती चिंता 
आत्महत्या केलेला परिवार मूळचा बिहारमधील भागलपूर येथील असल्याचे सांगितले जाते. दीपककुमार झा असे आत्महत्या केलेल्या कुटुंब प्रमुखाचे नाव होते. ते एका खासगी कंपनीत विक्रीप्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांच्यावर मोठ्या कर्जाचा बोजा होता. कर्ज फेडण्याच्या चिंतेतूनच त्यांनी कुटुंबीयांसह आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. दीपककुमार यांच्यासोबत त्यांची पत्नी, दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि लहान भाऊ राहात होते. दोन जणांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत होते, तर इतर पाच जणांचे मृतदेह खाटेवर पडलेले आढळून आले.

Web Title: 7 members of a family commit suicide in Ranchi