भूत बनून प्रवाशांना दाखवायचे भीती, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

बंगळुरुमध्ये रात्री भूत बनवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बंगळुरु : शहरातील सात 20 ते 22 वर्षीय तरुणांना मध्यरात्री भूत बनवून लोकांना घाबरवल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. हे तरुण रात्री सफेद कपडे
परिधान करुन व लांब केसांचे विग घालून पादचारी तसेच प्रवाशांना घाबरवायचे. नंतर त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल करायचे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील यशवंतपुर येथील शरीफ नगरमध्ये गेल्या रविवारी आणि सोमवारी रात्री 2 वाजता 20 वर्षीय तरुण खालिक आणि त्याचा
मित्र पादचाऱ्यांसोबत भुताचा प्रॅँक करत असल्याची माहिती मिळाली. नंतर ताबडतोब त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या इतर पाच मित्रांनाही अटक करण्यात
आली. याबाबत स्थानिकांनीदेखील पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. यावरुन तेथे एका पोलिस शिपायाचीदेखील ड्युटी लावण्यात आली होती.

रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन कारवाई
काही दिवसांपूर्वी या तरुणांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला होता. यात ते एका रिक्षाचालकाला घाबरवतात. भीतीमुळे रिक्षाचालक रस्त्यातूनच
आपली रीक्षा परत वळवून धुम ठोकतो. याच रिक्षाचालकाने पोलिसांकडे तरुणांची तक्रार केल्याची माहिती आहे. त्यावरुनच पोलिसांनी तरुणांना अटक केली आहे. केवळ
मजेखातर असे कृत्य करत असल्याचे तरुणांनी सांगितले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 youths arrested for making prank of ghost in banglore