सरकारची निती स्पष्ट; कलम 370 रद्द करणे पाकिस्तानला धक्का असल्याचे मोदींचे मत

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

- सरकारची निती स्पष्ट
- दिशाही योग्य
- पंतप्रधान मोदी यांचा दावा
- वृत्तसंस्थेला मुलाखत 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील 75 दिवसांमध्ये शानदार कामगिरी केली असून "स्पष्ट निती आणि योग्य दिशा' या धोरणावर आमची वाटचाल सुरू आहे, शेतकऱ्यांपासून काश्‍मीरपर्यंत आम्ही सर्वांसाठी काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370वे कलम संपुष्टात आणल्यानंतर आज प्रथमच मोदींनी जाहीर मुलाखत देत सरकारची ही भूमिका स्पष्ट केली. 

"पहिल्या 75 दिवसांच्या अवधीमध्येच आमच्या सरकारच्या कामकाजाने प्रचंड वेग घेतला असून, मुलांची सुरक्षितता, "चांद्रयान-2', भ्रष्टाचाराविरोधात कारवाई, मुस्लिम महिलांची तोंडी तलाकच्या अभिशापासून मुक्तता आदी बाबी आमच्या सरकारने करून दाखविल्या आहेत. बहुमताच्या जोरावर हे साध्य केले जाऊ शकते, हे आम्ही दाखवून दिले आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. ""सद्यस्थितीतील सर्वांत गंभीर समस्या असणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली असून पाण्याचा साठा आणि पुरवठा या दोन्ही आघाड्यांवर आम्ही काम करणार आहोत,'' असे ते म्हणाले. संसदेच्या कामकाजावरदेखील मोदींनी समाधान व्यक्त केले. संसदेचे पहिले अधिवेशन हे अधिक फलदायी ठरल्याचे ते म्हणाले. 

पाकिस्तानला धक्का 
भारत सरकारने ज्या पद्धतीने 370 वे कलम आणि कलम 35 (अ) संपुष्टात आणले ते पाहून पाकिस्तानलाही मोठा धक्का बसला. आज देशातील प्रत्येक नागरिक जम्मू आणि काश्‍मीर व लडाखमधील लोकांच्या बाजूने उभा ठाकला आहे. केवळ या कलमामुळेच जनता विकासापासून दूर राहत होती. आम्ही मात्र येथील जनतेसाठी आर्थिक विकासाची दारे खुली करण्याचा निर्णय घेतला. जम्मू आणि काश्‍मीर; तसेच लडाखमधील माझ्या बंधू भगिनींना उज्ज्वल भवितव्य हवे आहे ते आम्ही या माध्यमातून देत आहोत, असे मोदी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On 75th day in office PM says govt going full tilt with spasht neeti sahi disha'