देशात बाहेरून आला 770 अब्ज डॉलर काळा पैसा

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घ्यावा 
सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सर्व संशयास्पद खातेधारकांची तपासणी करून त्यांचा नेमका लाभार्थी कोण आहे, याचा शोध घ्यावा. सर्व बॅंकांनी त्यांच्याकडील खात्यांचा खरा लाभार्थी कोण आहे, याची माहिती करून घ्यायला हवी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - देशात 2005-2014 या कालावधीत बाहेरून येणारा काळा पैसा सुमारे 770 अब्ज डॉलर होता, असा अंदाज अमेरिकास्थित "ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी' या "थिंकटॅंक'ने आपल्या अहवालात वर्तविला आहे. याच काळात देशातून बाहेर गेलेला काळा पैसा 165 अब्ज डॉलर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

"विकसनशील आणि उदयोन्मुख देशांमधील अवैध पैशाचा ओघ : 2005-2014' या अहवालात म्हटले आहे, की केवळ 2014 मध्ये 110 अब्ज डॉलर एवढा काळा पैसा भारतात बाहेरून आला. त्याचवेळी देशातून बाहेर जाणारा काळा पैसा 23 अब्ज डॉलर होता. जगभरातील विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधून बाहेर जाणाऱ्या अवैध पैशाचा ओघ वेगाने वाढत असून, 2014 मध्ये हा पैसा एक ट्रिलियन डॉलर होता. 

जगभरातील देशांमध्ये अवैध पैशाच्या आतमध्ये येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या ओघाचा हा जागतिक पातळीवर प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे, की भारतातून बाहेर जाणाऱ्या अवैध पैशाचा ओघ देशाच्या एकूण व्यापाराच्या तीन टक्के आहे. भारताचा एकूण व्यापार 2005-2014 या काळात 5 हजार 500 अब्ज डॉलर होता, तर बाहेर जाणाऱ्या काळ्या पैशाचा ओघ 165 अब्ज डॉलर होता. 

खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घ्यावा 
सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सर्व संशयास्पद खातेधारकांची तपासणी करून त्यांचा नेमका लाभार्थी कोण आहे, याचा शोध घ्यावा. सर्व बॅंकांनी त्यांच्याकडील खात्यांचा खरा लाभार्थी कोण आहे, याची माहिती करून घ्यायला हवी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 

Web Title: $ 770 bn black money entered India between 2005 to 2014: Report