लष्कराचा राजकीय लाभासाठी वापर नको; माजी अधिकाऱ्यांचा लेटरबॉंब

वृत्तसंस्था
शनिवार, 13 एप्रिल 2019

फेक न्यूजचा संशय 
दुसरीकडे, माजी हवाईदल प्रमुख एन. सी. सुरी यांनी म्हटले आहे की, सैन्यदले राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत आणि ती सरकारच्या आदेशानुसारदेखील काम करत नाहीत. आपण हे पत्रही लिहिले नाही आणि त्यासाठी आपली परवानगीदेखील कोणीही घेतली नव्हती. पत्रात जे काही आहे त्याच्याशी आपण सहमत नाही. तर जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांनी पत्र कोणी लिहिले याची कल्पना नसल्याचे सांगताना हे पत्र फेक न्यूजचे उदाहरण असल्याचेही म्हटले आहे. लष्कराचे माजी उपप्रमुख एम. एल. नायडू यांनीही अशाप्रकारचे पत्र पाहिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : सैन्यदलांचा राजकीय लाभासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारा गैरवापर रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी असलेल्या दीडशेहून अधिक माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या कथित पत्रावरून गोंधळ वाढला आहे. राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. तर, पत्रात उल्लेख असलेल्या काही माजी अधिकाऱ्यांनीही पत्र लिहिल्याबद्दल कानावर हात ठेवला आहे. 

हवाईदल, लष्कर आणि नौदलाच्या आठ माजी प्रमुखांचाही समावेश असलेल्या 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून सैन्यदलांचा राजकीय लाभासाठी सत्ताधाऱ्यांकडून वापर केला जात असल्याची तक्रार केली आहे. कालच (ता. 11) म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी हे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले जात असून सध्या सोशल मीडियामध्ये हे पत्र व्हायरल होत आहे.

सत्ताधाऱ्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे श्रेय घेतले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून सातत्याने असे केले जात आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लष्कराला मोदींची सेना असेही म्हटले होते. राष्ट्रपतींनी तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांचेही दोन गट 
अर्थात या पत्रावरून माजी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. मेजर जनरल हर्ष कक्कड, माजी लष्कर प्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी असे पत्र पाठविण्याला दुजोरा दिला. तर माजी हवाईदल प्रमुख एन. सी. सुरी, तर, पत्रात सर्वात पहिली सही असलेले जनरल एसएफ रॉड्रिग्ज यांनी यात सहभागाचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. सहमतीनंतरच पत्रामध्ये आपले नाव जोडण्यात आल्याचे हर्ष कक्‍कड यांनी म्हटले आहे. तर देशात सध्या असलेल्या वातावरणाबद्दल राष्ट्रपतींना माहिती देणारे हे पत्र असून संस्थांकडे होत असलेले दुर्लक्ष, सैन्यदलांचा राजकीय फायद्यासाठी होणारा गैरवापर याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आल्याचे शंकर रॉय चौधरी यांनी म्हटले आहे. 

फेक न्यूजचा संशय 
दुसरीकडे, माजी हवाईदल प्रमुख एन. सी. सुरी यांनी म्हटले आहे की, सैन्यदले राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत आणि ती सरकारच्या आदेशानुसारदेखील काम करत नाहीत. आपण हे पत्रही लिहिले नाही आणि त्यासाठी आपली परवानगीदेखील कोणीही घेतली नव्हती. पत्रात जे काही आहे त्याच्याशी आपण सहमत नाही. तर जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांनी पत्र कोणी लिहिले याची कल्पना नसल्याचे सांगताना हे पत्र फेक न्यूजचे उदाहरण असल्याचेही म्हटले आहे. लष्कराचे माजी उपप्रमुख एम. एल. नायडू यांनीही अशाप्रकारचे पत्र पाहिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

अशा प्रकारचे पत्र निषेधार्हच आहे, निवडणुकीच्या काळात अशा बनावट तक्रारी केल्या जाऊ नयेत. 
निर्मला सीतारामन, संरक्षणमंत्री 

सैन्यदलांच्या माजी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे पुढे यावे लागणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. 
प्रियांका चतुर्वेदी, प्रवक्‍त्या कॉंग्रेस 

Web Title: 8 ex service chiefs write to President say military being used for votes