पुरामुळे 85% काझीरंगा पाण्याखाली; किमान 7 गेंडे मृत

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे सात गेंड्यांसह किमान 107 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यांपैकी 13 प्राणी काझीरंगातून बाहेर पडताना महामार्गावर वाहनांची धडक बसून मृत झाले

गुवाहाटी - आसाम राज्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका येथील जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानास बसला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काझीरंगाचा तब्बल 85% भाग पाण्याखाली गेला आहे. काझीरंगात उद्‌भविलेली ही पूरस्थिती गेल्या तीन दशकांतील सर्वांत आव्हानात्मक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने जंगलामधील प्राण्यांनी शेजारील कार्बी अंगलॉंग जिल्ह्यातील उंचावरील भागांमध्ये आश्रय घेतला आहे. अभयारण्यामधील काही भागांत पाण्याची पातळी तब्बल सहा फुटांपेक्षा जास्त आहे. पुरात अभयारण्यात होणारी तस्करी रोखण्याकरिता विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या चौक्‍याही बुडाल्या आहेत.

गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे सात गेंड्यांसह किमान 107 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यांपैकी 13 प्राणी काझीरंगातून बाहेर पडताना महामार्गावर वाहनांची धडक बसून मृत झाले. महामार्गांवरही पुराचे पाणी ठिकठिकाणी साचले आहे.

Web Title: 85% of Kaziranga under water