पोलिस गोळीबारात नऊ आंदोलक ठार 

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

प्रकल्पाला विरोध का? 
वेदांता कंपनीच्या स्टरलाइट कॉपर या प्रकल्पातून दरवर्षी चार लाख टन तांब्याचे कॅथोड उत्पादित केले जाते. हे उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा विचार आहे. या कंपनीने पर्यावरणविषयक कायदे न पाळल्याबद्दल तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचा परवाना रद्द केला होता. मात्र, कंपनीने त्याला आव्हान दिले असून सुनावणी सुरू आहे. या कंपनीमुळे नदी प्रदूषण होत असून, भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याचा आरोप आहे. तसेच, कंपनीच्या चिमण्यांचा आकारही लहान असल्याने अधिक प्रदूषण होत असल्याचे म्हणणे आहे. 

तुतिकोरीन (तमिळनाडू) - प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात नऊ जण ठार, तर सतरा जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. 

वेदांता या ब्रिटिश कंपनीच्या येथील "स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कंपनीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते. हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या प्रकल्पावर मोर्चा नेण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने जमाव हिंसक बनला. जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली आणि सरकारी वाहनांसह काही खासगी वाहनांचीही जाळपोळ सुरू केली. या मोठ्या प्रमाणावर हिंसक बनलेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचाही वापर केला. मात्र, त्याचा परिणाम न झाल्याने गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात आणि संघर्षात एका विद्यार्थिनीसह नऊ जण मृत्युमुखी पडले, तर सतरा जण जखमी झाले. 

द्रमुक, एमडीएमके, कॉंग्रेस आणि इतर स्थानिक पक्षांनी या गोळीबाराचा निषेध करत तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल तमिळनाडू सरकारने दु:ख व्यक्त केले. मात्र, मागणी मान्य करण्यासाठी हिंसेचा मार्ग जमावाने अवलंबिल्याने गोळीबार टाळता आला नाही, अशी बाजूही सरकारने मांडली. या घटनेनंतर शेजारील जिल्ह्यातून जादा कुमक मागवत प्रशासनाने जमावबंदी लागू करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. तसेच, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना तीन लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.  

प्रकल्पाविरोधात सरकारने काहीही कारवाई न केल्यानेच आंदोलनाची वेळ आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे. 
- एम. के. स्टॅलिन, द्रमुक नेते 

हा सरकारपुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या लोकांचा सरकारने खून केला आहे. 
- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष 

प्रकल्पाला विरोध का? 
वेदांता कंपनीच्या स्टरलाइट कॉपर या प्रकल्पातून दरवर्षी चार लाख टन तांब्याचे कॅथोड उत्पादित केले जाते. हे उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा विचार आहे. या कंपनीने पर्यावरणविषयक कायदे न पाळल्याबद्दल तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचा परवाना रद्द केला होता. मात्र, कंपनीने त्याला आव्हान दिले असून सुनावणी सुरू आहे. या कंपनीमुळे नदी प्रदूषण होत असून, भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याचा आरोप आहे. तसेच, कंपनीच्या चिमण्यांचा आकारही लहान असल्याने अधिक प्रदूषण होत असल्याचे म्हणणे आहे. 

Web Title: 9 killed in police firing in tamilnadu