
Credit Card Fraud : बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्याने सचिन तेंडुलकरसह ९५ सेलिब्रेटींचा सिबिल स्कोर केला खराब; आरोपी...
नवी दिल्ली - अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, आलिया भट यांच्यासह सुमारे ९५ सेलिब्रिटींच्या नावे बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार करून बँकांकडून क्रेडिट कार्ड मिळवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पूर्व परिक्षेत्राच्या सहआयुक्त छाया शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील क्रेडिट कार्ड निर्मात्या कंपनीशी संबंधित प्रेम शेखावत यांनी तक्रार दाखल केली की, काही लोकांनी सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, हिमेश रेशमिया, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सारख्या लोकांच्या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे त्यांच्या कंपनीकडून क्रेडिट कार्ड मिळवले. यातून 21 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून क्रेडिट कार्डचा आयपी अॅड्रेस आणि मोबाइलच्या सीडीआरवरून आरोपीचा शोध घेतला, तपासादरम्यान ही टोळी दिल्ली आणि जयपूर येथून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी छापा टाकून दिल्लीतील छज्जूपूर भागातून एक आरोपी सुनील कुमार याला अटक केली. सुनीलकडून मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, क्रेडिट कार्ड, ई-श्रम कार्ड, मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले.
आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने याच परिसरातील एका दुकानातून या सर्व वस्तू घेतल्या आहेत. हे दुकान त्याचा साथीदार पुनीतचे आहे. जयपूरमध्ये राहणाऱ्या विश्व भास्कर शर्मा यांच्याकडून फसवणुकीची कला शिकल्याचे सुनीलने सांगितले.
त्यांनी टेलिग्रामवर विश्व भास्कर यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांनी दुसरा आरोपी पंकज मिश्रा यांची भेट घेतली, ज्याने स्वतःचे नाव अभिषेक बच्चन असल्याचे सांगितले होते. बनावट क्रेडिट कार्डमुळे सचिन तेंडुलकर, आलिया भटसह ९५ सेलिब्रिटींची फसवणूक
यानंतर पोलिसांनी विश्व भास्कर शर्मा, पंकज मिश्रा, पुनीत आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट पॅन, कार्ड, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली.
आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांनी लोन अॅप्स, बँका आणि क्रेडिट कार्ड प्रोव्हायडर 'वन कार्ड'च्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. यामुळे सेलिब्रिटींचा सिबिल स्कोअर खराब झाला होता.
आरोपी विश्व भास्कर शर्माने राजस्थान टेक्निकल यूनिवर्सिटीमधून B.Tech केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अनेक टेलिग्राम ग्रुप्स आणि युट्यूब चॅनेल्सशी संबंधित होता, जिथे त्याने फसवणूक कशी करायची हे शिकले आणि चांगले सिबिल स्कोअर असलेल्या सेलिब्रिटींच्या नावाने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवून क्रेडिट कार्ड मिळवले किंवा बँकिंग अॅप्सवरून त्यांच्या नावावर कर्ज घेतले.
आरोपींनी बँकांच्या केवायसीमध्ये फेरफार करून ही फसवणूक केली. आरोपी पुनीत आणि मोहम्मद आसिफ आधार कार्ड अपडेट करण्याचे दुकान चालवतात.
या लोकांनी बनावट कागदपत्रे तयार करून सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, हिमेश रेशमिया, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, महेंद्रसिंह धोनी, करण जोहर, दीपक पदुकोण, शिल्पा शेट्टी अशा ९५ सेलिब्रिटींच्या नावे क्रेडिट कार्ड मिळवले.
आरोपींकडून १० मोबाइल फोन, ३४ बनावट पॅनकार्ड, २५ आधार कार्ड, ४० डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ४२ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.