आता सीमकार्ड खरेदीसाठी आधारची सक्ती नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड खरेदी करताना आधारकार्ड देणे बंधनकार नसल्याचे परिपत्रक दूरसंचार विभागाने काढले आहे. आधारकार्डाऐवजी पर्यायी ओळखपत्रे उदा. वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इ. घ्यावे असेही त्यात सांगितले आहे.

नवी दिल्ली : सरकारने ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत खुशखबर आणली आहे. आता कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड खरेदी करताना आधारकार्ड देणे बंधनकार नसल्याचे परिपत्रक दूरसंचार विभागाने काढले आहे. आधारकार्डाऐवजी पर्यायी ओळखपत्रे उदा. वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इ. घ्यावे असेही त्यात सांगितले आहे.

ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सीमकार्ड कंपन्यांना या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी करण्याचे आदेश दूरसंचार विभागाच्या सचिव अरूणा सुंदरराजन यांनी दिले आहेत. 

यापूर्वी कोणतेही सीमकार्ड घेताना आधारकार्ड देणे बंधनकारक होते. आधारकार्डशिवाय कोणालाही सीमकार्ड खरेदी करता येणार नाही अशी भूमिका सर्व टेलिकॉम कंपन्यांनी घेतली होती. पण यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्डाचे कोणतेही बंधन नसल्याचा निर्णय दिला होता. पण सीमकार्ड कंपन्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती, म्हणून दूरसंचार विभागाने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व कंपन्यांना दिला आहे.  

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आधार सक्तीमुळे टेलिकॉम कंपन्या आधारकार्ड घेऊन व्हेरीफिकेशन (पडताळणी) करत होत्या, पण परदेशी नागरिक, अनिवासी भारतीयांना काही कालावधीसाठी सीमकार्ड घेण्यची गरज लागत असल्याने, केवळ आधारसक्तीमुळे ते खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे सरकारने गंभीरपणे दखल घेत यावर तोडगा काढला आहे. 

Web Title: Aadhaarcard not must for mobile SIM says by telecom ministry