'आधार' महत्त्वाचे; पण लाभासाठी अनिवार्य नाही: रवीशंकर प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

आधारकार्डाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बोलताना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी "आधार कार्ड महत्त्वाचे महत्त्वाचे आहे. मात्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य नाही', असे स्पष्टरकरण केले आहे.

नवी दिल्ली : आधारकार्डाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बोलताना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी "आधार कार्ड महत्त्वाचे महत्त्वाचे आहे. मात्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य नाही', असे स्पष्ट केले आहे.

सरकारच्या समाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, बँक खाते सुरू करताना किंवा प्राप्तिकर भरताना करण्यात येणाऱ्या आधार कार्डच्या सक्तीवरही बंधन घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना प्रसाद म्हणाले, 'आधार कार्डासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेबाबत मी काहीही बोलणार नाही. मात्र हे स्पष्ट करू इच्छितो की विविध कल्याणकारी योजना गरीबांसाठी पोचविण्यासाठी आधार कार्डचा उपयोग करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचा असा अर्थ नाही की या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे.' जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आणि वाहन परवाना यासारखे ओळखपत्र वापरता येईल, असेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने सुमारे विविध तीन डझन सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केले होते. या आदेशांना ज्येष्ठ वकील श्याम दीवाण यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

Web Title: Aadhar important, but not mandatory : Prasad