AAP : सगळे कर्नाटक निकालात व्यस्त! तिकडं केजरीवालांच्या 'आप'ने लोकसभेत खातं उघडलं | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Rinku meets party’s national convener Arvind Kejriwal

AAP : सगळे कर्नाटक निकालात व्यस्त! तिकडं केजरीवालांच्या 'आप'ने लोकसभेत खातं उघडलं

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला तरी लोकसभेत एकही सदस्य नव्हता. आता जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय संपादन करून आपने लोकसभेत खाते उघडले आहे. सुशीलकुमार रिंकू यांनी कॉंग्रेसच्या करमजित कौर चौधरी यांना ५८,६९१ मतांनी पराभूत केले.

या जागेवर अकाली दल बसपचे डॉ. सुखविंदर सुक्खी आणि भाजपचे इंदर इक्बाल सिंह अटवाल हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवर राहिले. रिंकू यांना ३ लाख २ हजार २७९ मते पडली तर कौर चौधरी यांना २ लाख ४३ हजार ५८८ मते पडली.

काही दिवसांपूर्वीच ‘आप’ला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. आपचे राज्यसभेत १० सदस्य आहेत. लोकसभेत निवडून आलेले भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार सिमरनजित मान यांनी विजय संपादन करून ‘आप’ला जोरदार धक्का दिला होता.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाल्याने जालंधरची जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसने करमजित कौर चौधरी यांना उमेदवारी दिली. आपने सुशीलकुमार रिंकू यांना उमेदवारी दिली. ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सारी शक्ती पणाला लावली. याचा परिणाम म्हणजे ‘आप’चा उमेदवार जालंधरमधून निवडून आला.

विधानसभा पोटनिवडणूक

उत्तर प्रदेशातील रामपूरच्या स्वार मतदारसंघातून भाजप आण अपना दलचे उमेदवार शफीफ अहमद यांनी समाजवादी पक्षाच्या अनुराधा चौधरी यांना ८ हजार ७२४ मतांनी पराभूत केले. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने जागा रिक्त झाली होती.

मिर्झापूरच्या छानबे मतदारसंघात भाजप आणि अपना दलाच्या उमेदवार रिंकी कोल यांनी समाजवादी पक्षाच्या किती कोल यांना ९ हजार ५८९ मतांनी पराभूत केले. आमदार राहुल कोल यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. राहुल यांची पत्नी रिंकी कोल यांना अपना दलने तिकीट दिले होते.

ओडिशाच्या झारसुगुडा विधानसभा मतदारसंघात बीजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांचा विजय झाला. आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांची २९ जानेवारी रोजी हत्या झाल्यानंतर जागा रिक्त झाली होती. त्यांचीच कन्या ४८ हजार मतांनी विजयी झाली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार तंकाधर त्रिपाठी यांना पराभूत केले. दीपाली दास यांना १ लाख ७ हजार मते मिळाली तर त्रिपाठी यांना ५८ हजार ३८४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार तरुण पांडेय यांना तिसरे स्थान मिळाले.

मेघालयाच्या सोहियोंग विधानसभा मतदारसंघातून युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार सिंशर कुपर रॉय यांचा विजय झाला. त्यांनी एनपीपीच्या समलिन यांचा ३ हजार ४२२ मतांनी पराभव केला. सिंशर यांना १६ हजार ६७९ मते मिळाली तर मालनगियांक यांना १३ हजार २५७ मते मिळाली. यूडीपीचे एचडीआर लिंगडोह यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.