"मोदी लाट' कसली; ही तर "ईव्हीएम लाट': आप

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

आपने समाधानकारक काम केले असल्याची धारणा असल्याने दिल्ली महानगरपालिकेत झालेला निर्णायक पराभव पक्ष नेत्यांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपने ईव्हीएम यंत्रे व निवडणूक आयोगासही कठोर टीकेचे लक्ष्य केले होते

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांमधील "निराशजनक' निकालांच्या पार्श्‍वभूमीवर औपचारिक प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पक्षाने (आप) आज (बुधवार) पराभवाचे खापर "ईव्हीएम' यंत्रांवर फोडले. दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपचा झालेला पराभव हे "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट उदाहरण असल्याची भावना पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये मोदीलाट नसून ईव्हीएम लाट असल्याचे या निकालांमधून दिसून येत असल्याची कडवट टीका आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी या पार्श्‍वभूमावर बोलताना व्यक्त केली आहे. आपचे मुख्य नेते व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस राय हे संबोधित करत होते.

"ही मोदीलाट नसून ईव्हीएम लाट आहे. अशा प्रकारच्या राजकारणामधून भारतीय जनता पक्ष (भाजप) लोकशाहीची हत्या करत आहे,'' असे राय म्हणाले.

निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर आपमधील इतर नेत्यांनीही निराशा व्यक्त केली आहे. ज्या पक्षाने गेल्या 10 वर्षांत दिल्लीमधील रस्तेही साफ केले नाहीत; त्या पक्षास दिल्ली महानगरपालिकेमध्ये विजय मिळेलच कसा, अशी संतप्त विचारणा आपचे अन्य एक महत्त्वपूर्ण नेते आशुतोष यांनी यावेळी केली. ""सत्तेत अवघी दोन वर्षे असतानाही आपने दिल्लीमधील नागरिकांसाठी खूप काम केले. विशेषत: आरोग्य व शिक्षण या दोन क्षेत्रांत आपकडून महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे,'' असे आशुतोष यांनी सांगितले. आपने समाधानकारक काम केले असल्याची धारणा असल्याने दिल्ली महानगरपालिकेत झालेला निर्णायक पराभव पक्ष नेत्यांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी आपने अक्षरश: युद्धस्तरावर प्रचार केला होता. या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपने ईव्हीएम यंत्रे व निवडणूक आयोगासही कठोर टीकेचे लक्ष्य केले होते. केजरीवाल यांनी दिल्लीला मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आणि कचरामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले होते. 'जर तुम्ही (दिल्लीकर) भारतीय जनता पक्षाला मतदान केले आणि त्यानंतर तुमच्या घरात कोणी डेंग्यु किंवा चिकुनगुनियाने आजारी पडले तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पुढील पाच वर्षे दिल्ली अस्वच्छच राहील', असे ते म्हणाले होते. मात्र यानंतरही पराभव झाल्यामुळे आपकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: AAP blames EVM machines again