दिल्ली निवडणूक: 'आप'च्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त!

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

लोकशाहीमध्ये 'विजेता कोण' हे कुठलेही 'इव्हीएम' ठरवत नाही; जनताच ठरवत असते, हे आता तरी अरविंद केजरीवाल यांना समजले असावे. केजरीवाल यांच्या तुघलकी कारभाराच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे. 
- मनोज तिवारी, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष

नवी दिल्ली : राजौरी गार्डनमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिल्लीतील सत्ताधारी 'आम आदमी पार्टी'च्या उमेदवाराला डिपॉझिट गमावावे लागले. या पोटनिवडणुकीत भाजपच्या मजिंदरसिंग सिरसा यांनी 14 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. सिरसा हे मूळचे अकाली दलाचे असले, तरीही ही निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढविली होती. 

या पोटनिवडणुकीत भाजपला 40,602 मते मिळाली; तर दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसला 25,950 मते मिळाली. 'आप'च्या हरजितसिंग यांना केवळ 10,243 मते मिळाली. या मतमोजणीच्या सर्व 17 फेऱ्यांमध्ये भाजपच्या सिरसा यांनी आघाडी कायम राखली. या पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतमोजणीच्या सातव्या फेरीनंतर सिरसा यांना निर्णायक मोठी आघाडी मिळाली. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरवात केली. 

2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सिरसा निवडून आले होते. पण 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 'आप'च्या जर्नेलसिंग यांच्याकडून सिरसा यांना पराभव स्वीकारावा लागला. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 'आप'तर्फे जर्नेलसिंग यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे त्यांनी दिल्ली विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. 

दिल्लीमध्ये येत्या 23 एप्रिल रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. पंजाब आणि गोव्यातील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि 'आप'साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालास महत्त्व प्राप्त झाले होते. यंदा प्रथमच दिल्ली महापालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात 'आप', भाजप आणि कॉंग्रेस असे तीन प्रमुख पक्ष असतील. 

आमच्यावर परिणाम होणार नाही : आप 
या पोटनिवडणुकीच्या निकालाचा आगामी महापालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "या पराभवाचा महापालिकेवर काहीही परिणाम होणार नाही. दिल्ली सरकारच्या कामगिरीमुळे महापालिकेतही 'आप'चाच विजय होणार आहे. गेल्या निवडणुकीत येथे विजय मिळविणाऱ्या जर्नेलसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा देत पंजाबमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय जनतेला आवडला नसावा. 

Web Title: AAP lost bypoll in Rajouri Garden; BJP wins ahead of MCD elections